नागपूर,दि.26ः-सहनशीलता आणि मातृत्वाच्या वीटेवर बहुजन समाजाची इमारत उभी आहे. एकवेळ पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखालील वीटा काढल्या तर विठू कोसळणार नाही. कारण, तो निगरुण निराकार आहे. पण, सहनशीलतेची आणि मातृत्वाची वीट काढली तर एकही घर उभे राहु शकणार नाही. त्यामुळे बहुजन समाजांनी खोटी प्रतिष्ठा,भंपकबाजी व अहंकार याला तिलांजली दिली पाहिजे, असे प्रा. मधुकर वाकोडे यांनी प्रतिपादन केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवनातील लोकमान्य टिळक सभागृहात दोन दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी उद्घाटकीय भाषणात प्रा.वाकोडे बोलत होते.अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. विजया मारोतकर होत्या.याप्रसंगी प्राचार्य बबन तायवाडे, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार बघेल, स्वागताध्यक्ष वृंदा विकास ठाकरे, आदिवासी साहित्यिक उषाकिरण आत्राम, प्रा. जावेद पाशा, प्रा. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, वैदिक की अवैदिक परंपरा स्वीकारायची याविषयी भ्रमात न राहता आपली घाम व श्रमाची परंपराच उत्तम आहे. या परंपरेने बहुजनांना श्रमाची श्रीमंती देण्यासोबतच लोकसाहित्याची संपदा दिली. लोकसाहित्य मराठी साहित्यापेक्षाही समृद्ध असून, ७0 टक्के बहुजन स्रीयांनी लोकसाहित्याची निर्मिती केली असल्याचे वाकोडे यांनी नमूद केले.वाकोडे म्हणाले खोटी प्रतिष्ठा,भंपकबाजी व अहंकार हे बहुजन समाजाचे शत्रू आहेत. बहुजन समाजाने त्यापासून दूर राहिले पाहिजे. सहनशीलता आणि मातृत्वाच्या विटेवर बहुजन समाजाची इमारत उभी आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाखालची वीट काढली तरी तो उभा राहील. तो निर्गुण,निराकार आहे. मात्र, सहनशीलतेची आणि मातृत्वाची वीट काढली तर समाजातले एकही घर उभे राहू शकणार नाही. बहुजन स्त्रियांनी घरापासून हा समाज सांभाळला आहे आणि दोन हजार वर्षांच्या लोकसाहित्याच्या निर्मितीतही ७० टक्के वाटा स्त्रियांचाच आहे.ओबीसींनी आपला अहंकार सोडला आणि स्वतःला शूद्र समजले तर काहीही बिघडत नाही. कमजोराला आपला खांदा देऊन अधिक समोर नेले तर ओबीसी समाज कधीही मागे पडणार नाही, असे मत व्यक्त करताना त्यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक सुषमा भड यांनी केले. संमेलनाची भूमिका संध्या राजूरकर, तर स्वागतपर भाषण वृंदा ठाकरे यांनी केले.संचालन वीणा राऊत तर आभार कल्पना मानकर यांनी मानले.
रूढी व परंपरेवर आसूड-उषाकिरण आत्राम
आदिवासींमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे आदिवासी समाजात एकही बलात्कार होत नाही. स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य प्रदान करणारी आदिम संस्कृतीचे लिखीत स्वरुपातील साहित्य पुरेसे उपलब्ध नसल्याने याचा प्रचार व प्रसार झाला नाही. या संस्कृतीमध्ये स्त्रीच्या अस्मितेला ठेच पोहचल्यास प्रसंगी ती वाघिणही होते. ओबीसी महिलांच्या बाबतीत वारसाने चालत आलेल्या रूढी व परंपरेवर उषाकिरण आत्राम यांनी आसूड ओढले. महिलांनी परंपरांचे जोखड झुगारून द्यावे. अत्याचार करणार्याची वाघीण होऊन नरडी फोडण्याचे तसेच प्रेमाच्या गोष्टी, प्रेमाची कविता आणि सार्जशृंगाराच्या साहित्यांपेक्षा वास्तवाला भीडणारी साहित्य निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.





