Ø महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
भंडारा, दि. 7 : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयास प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल क्रमांक नजिकच्या बँक शाखा किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सादर करुन आधार कार्ड बँकेशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 27 डिसेंब 2019 रोजीचे आदेशान्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केलेली असून या शासन निर्णयान्वये सविस्तर योजनेचा तपशिल नमुद केलेला आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भुधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बँकांनी संबंधित शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिलेले होते. त्याप्रमाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी जिल्हयातील बँकनिहाय सादर केलेल्या अहवालावरुन एकूण 1569 शेतकऱ्यांनी अधार कार्ड बँकेत सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे लिंकींग झालेले नाही तसेच भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी त्यांचे सभासद असलेल्या 368 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची तालुका निहाय आधार कार्ड सादर केलेल्या सभासदांची यादी घेतली असता 7 तालुके मिळून एकूण 4157 शेतकरी सभासदांनी आधार कार्ड सादर केलेले नाही.
अशा शेतकरी सभासदांची ॲनेक्चर-4 मध्ये बँकनिहाय, संस्थानिहाय व तालुकानिहाय यादी ग्रामपंचायत, चावडी, संस्था कार्यालय, बॅक शाखा येथे 7 जानेवारी 2020 रोजी प्रसिध्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आल्या असून संबंधित तहसिलदार यांना प्रसिध्द करण्यासाठी देण्यात आलेली आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल नंबर, नजिकच्या बँक शाखा, विविध कार्यकारी संस्था, भंडारा तर्फे करण्यात येत आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज खाते आधारकार्ड सोबत संलग्नित असणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या शेतकऱ्यांचे वरील प्रसिध्द केलेल्या यादीत नाव असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेत तात्काळ आधार कार्डची झेरॉक्स जमा करावी. जेणेकरुन सदर योजनेचा लाभ देण्यासंबंधाने बँकेस पुढील कार्यवाही करणे सोईचे होईल असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी केले आहे.





