23.5 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण* *: जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण* *: जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

0
63

**विविध आरोग्यपूर्ण योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
गोंदिया, दि.21 : योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.
आज इंदिरा गांधी स्टेडियम येथे 12 वा “आंतराष्ट्रीय योग दिन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष सचिन शेंडे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी संदिप बोरकर, धावपटू मुन्नालाल यादव यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोंदावले म्हणाले, गोंदिया जिल्ह्याला सुंदर, स्वच्छ व हिरवेगार करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून नशामुक्ती, योगसाधना व अशाप्रकारचे इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. योगाचे नियमित आचरण करुन सर्वांनी निरोगी आणि संतुलित जीवनशैली अंगीकारावी असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)” अशी असून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्व अधोरेखित करण्यात येत आहे. नियमित योगाभ्यासामुळे तणाव नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि जीवनशैलीजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. आधुनिक धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.नागेश गौतम यांनी शिथिलीकरणामध्ये ग्रीवा चालन, कटी चालन, स्कंद संचलन, घुटना संचलन तसेच योगासनामध्ये ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन, उत्तान मंडुकासन, मक्रासन, भुजंगासन, शलभासन, सेतु बंदासन, उत्तान पादासन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, शवासन त्याचप्रमाणे प्राणायाममध्ये कपाल भाती, शितली, अनुलोम विलोम, भ्रामरी, ध्यान (प्रणव) आदी योग प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतले.
या कार्यक्रमामध्ये नगर योग उत्सव समिती गोंदिया, अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिविंग, प्रजापिता ब्रम्हाकुमारी, ईश्वरीय विश्वविद्यालय, दिव्य योग फाउंडेशन, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडळ, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टीट्युट, योग मित्र मंडळ व बलवान योग आदी योग शाखांचा यामध्ये समावेश होता.
याप्रसंगी गोंदिया जिल्ह्याला नशामुक्त करण्याचा दृढ निश्चय करण्यासाठी “नशामुक्त भारत प्रतिज्ञा” सामुहिकरित्या घेण्यात आली. यावेळी नशामुक्त भारतासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. नागेश गौतम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रशांत कटरे यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
00000000

blank