38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Top News मासूलकसा जवळ कारला भीषण अपघातः सासू व सुन ठार

मासूलकसा जवळ कारला भीषण अपघातः सासू व सुन ठार

0
40
गोंदिया,दि.07 : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मासूलकसा गावाजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कार पुलावर धडकून झालेल्या भिषण अपघातात नागपूरातील एकाच कुटूबांतील सासू व सून दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़.
भारती रामसेवक चतुर्वेदी (६५) आणि निना महेश चतुर्वेदी (४५) असे मृत सासू-सुनेचे नाव असून महेश रामसेवक चतुर्वेदी (४७) व पलक महेश चतुर्वेदी (१३) असे गंभीर जखमींची नावे आहेत़. दोघांनाही गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे़
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील महेश चतुर्वेदी हे यवतमाळ येथे महावितरण विभागात उप अभियंता पदावर कार्यरत आहेत़. ते सहकुटुंब कार क्रमांक एमएच ३१ डीसी २५३३ ने छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून परत स्वगावी जात होते़ अशातच देवरीजवळील मासूलकसा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला त्यांच्या कारची जोरदार धडक बसून संपूर्ण कार पुलाचे कठडे तोडत पुलाच्या खाली कोसळली. यात महेश यांची पत्नी निना व आई भारती दोघांचाही जागीच मृत्यू झाला़ तर महेश व त्याची १३ वर्षाची मुलगी पलक दोन्ही गंभीर जखमी झाले़. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दोन्ही जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले़. यावेळी तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दोघांनाही गोंदियाला हलविण्याचा सल्ला दिला़.  दरम्यान, दोघांनाही गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे़. या प्रकरणी देवरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़