गोरेगाव –येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत एका बँक प्रतिनिधीने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या धक्कादायक प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्राहक या संदर्भात शाखा व्यवस्थापकाकडे तोंडी आणि लेखी तक्रारी करत आहेत.सदर प्रकरणाचे गांभिर्य ओळखत बँक व्यवस्थापक सतर्क झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. गोरेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत अंदाजे १५,००० खातेदार आहेत, ज्यापैकी बहुतेक गरजू, शेतकरी आणि सामान्य ग्राहक आहेत. ही बँक दररोज लाखो रुपयांचे व्यवहार हाताळते. बँकेचे कामकाज अधिक जलद व्हावे यासाठी बँक प्रशासन बँक प्रतिनिधींची नियुक्ती करते आणि त्यांना आर्थिक व्यवहारांसाठी मानधन देते. मात्र, काही बँक प्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. गोरेगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत अशाच एका घटनेमुळे ग्राहकांमध्ये भिती पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड नान्हे नावाच्या बँक प्रतिनिधीवर विश्वास ठेवून ग्राहकांनी बँकेत पैसे जमा केले होते. त्यानंतर, तो प्रतिनिधी पैसे जमा केल्याची औपचारिक पावती देत असे. मात्र, जेव्हा काही ग्राहक आपली पासबुक तपासण्यासाठी बँकेत गेले, तेव्हा त्यांना आढळले की रक्कम जमा झालेली नाही. हे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण समोर आल्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनाही आश्चर्य वाटले. संबंधित ग्राहकांनी फसवणुकीचा आरोप करत बँक व्यवस्थापकांकडे तोंडी आणि लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
तक्रारी येत आहेत
ठेव न जमा झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर बँक खातेधारकांकडून तोंडी आणि लेखी तक्रारी येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन निर्देश दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
डी.पी. कांबडे, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, गोरेगाव





