33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ गोंदिया पोलिसातर्फे विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

गोंदिया पोलिसातर्फे विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

0
28

देवरी,दि.09-  गोंदिया जिल्हा पोलिस आणि लेट्स टीच वन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  तालुक्यातील कडीकसा शासकीय आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गेल्या मंगळवारी (दि.7) करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे होते. यावेळी लेट्स टीच वन मुंबई या संस्थेचे प्रतिनिधी दीपेश टॅॅंक, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, आश्रमशाळेचे प्राचार्य राऊत, मेहताखेडाचे सरपंच महाराज सलामे, इस्तारीचे सरपंच राजकुमार अठभैया, चिचगडचे ठाणेदार अतुल तवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोंदियाचे जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजि करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री. कुलकर्णी म्हणाले की, या आश्रमशाळेत दूर अंतरावरून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. या विद्यार्थ्यांचा  बराच वेळ संसाधनाभावी प्रवास करण्यात जातो. यामुळे याचा गोष्टीची परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. त्यांचा हा वाया जाणारा वेळ त्यांच्या अभ्यासासाठी कामी पडावा, हा उद्देश ध्यानात घेऊन जिल्हा पोलिस दलाने या गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. ज्या विद्यार्थ्यांना आता सायकल मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांसह इतरांनी सुद्धा आपला वेळ अभ्यास आणि आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी खर्ची घालून देशाची उत्तम सेवा करण्याची जिद्द मनात बाळगावी, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

याशिवाय गणुटोला येथील धनिराम फागू मडावी याला गणुटोलाच्या सशस्त्र दुरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी मदत करून कृत्रिम हात बसविण्यासाठी मदत केली. या कर्मचाऱ्यांचा श्री. कुलकर्णी यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील येळमागोंदी येथे एका ग्रामसभेचे आयोजन करून  परिसरातील येळमागोंदी, गुजुरबळगा,मांगाटोला, धमदीटोला येथील नागरिकांना मोटार वाहन परवाना काढून देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पोलिस विभागाच्या सहकार्याने 60 नागरिकांना वाहन परवान्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन पोलिस उपनिरीक्षक जमादार यांनी केले. उपस्थितांचे आभार जगदाळे यांनी मानले. यावेळी चिचगड पोलिस ठाणेतील कर्मचारी, गणुटोला पोलिस दलाचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.