33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home क्रीडा जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 14 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रीत

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 14 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रीत

0
43

गोंदिया दि. ०९ :: राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया द्वारा दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिह्यातील गुणवंत खेळाडू (1 महिला,   1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक, 1 संघटक/क्रीडा कार्यकर्ता) यांना पुरस्कार देण्यात येतो.पुरस्कारांचे वर्ष हे 1 जुलै ते 30 जून या कालावधीत गत तीन वर्षाची कामगिरी पुरस्कारासाठी पात्र असेल. खेळाडू या गटात पुरस्काराकरीता अर्जदारांचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षापैकी तीन वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शक या पुरस्कार क्षेत्राकरीता क्रीडा मर्गदर्शक म्हणून सतत 10 वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांचे वय 30 वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे.

गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंची कामगिरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा संघटक/कार्यकर्ता यांनी सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे. त्यांनी वयाची 30 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम 10 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार प्राप्तींना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वितरण करण्यात येईल.वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या अर्जदारांनी परिपूर्ण प्रस्ताव 14 जानेवारी 2020 पर्यंत स्पायरल बाईंडींग करुन सिलबंद पाकीट जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 14 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रीत

गोंदिया : 12 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया द्वारा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्ह्यातील युवांनी केलेले समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवक विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो.जिल्हा युवा पुरस्कार (युवक व युवती स्वतंत्र), तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 10 हजार रुपये (युवक व युवती स्वतंत्र). प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम 50 हजार रुपये देवून गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जदारांनी परिपूर्ण प्रस्ताव 14 जानेवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, बालाघाट रोड, मरारटोली, गोंदिया येथे सादर करावे.

पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात संबंधित जिल्ह्यामध्ये सलग पाच वर्षे वास्तव्य असले पाहिजे. पुरस्कार युवक-युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे व 31 मार्च रोजी 35 वर्ष पर्यंत असावे. पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो इत्यादी). अर्जदार संस्था, युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्रक देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.

एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार/संस्थेच्या सदस्याचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेल्या चारित्र्य दाखला (संबंधीत क्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.