39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या मांजाची विक्री व वापर करणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करणार

पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या मांजाची विक्री व वापर करणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करणार

0
41

भंडारा, दि. 9 :- पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठया प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली असून त्यांची विक्री करणे, साठविणे व वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द मोठया प्रमाणात कार्यवाही करण्याची मोहिम वन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी अशा प्रकारच्या मांजा साठवणूक करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्यात यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.पतंग उडविणाचा मौसम सुरु झाला असून पतंग उडविण्यासाठी इको फ्रेंडली धागा पतंग शौकीनांनी वापरावा जेणे करुन पक्षांचे प्राण वाचतील व पतंग उडविण्याच्या खेळाचा देखील आनंदही घेता येईल.

देशात दरवर्षी हजारो पक्ष्यांना प्राणघातक मांजामध्ये अडकून प्राण गमवावे लागतात. तर कित्येक पक्षी कायमचे जायबंदी होतात. पक्षी हा घटक आपल्या जैवविविधतेचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्याला वाचविणे, जगविणे व त्यांचे संवर्धन करणे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे.सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा साठविणे, वापर करणे, विक्री करणे व त्याद्वारे पक्षांच्या जीवीतांस हानी पोहचविणे हे वन्यजीव( संरक्षण) कायदा 1972 चे कलम 9 नुसार गुन्हा असून त्याकरीता याच कायद्याचे कलम 51 ( 1) नुसार असे कृत्य करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कैद व रुपये 25 हजार पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.

तरी सर्व जनता व पक्षीप्रमींना वनविभाग भंडारा यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, पक्षांना घातक ठरणारा मांजा विक्री करणे, साठविणे, वापरणे व हस्तांतर करणे कायद्याने गुन्हा आहे. तसे केल्याचे निर्दशानास आल्यास  त्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांनी केले आहे.