32.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ १९ जानेवारीला १ लाख ९ हजार ८२८ बालकांना पोलिओचे लसीकरण

१९ जानेवारीला १ लाख ९ हजार ८२८ बालकांना पोलिओचे लसीकरण

0
51

गोंदिया,दि.15ः-राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २0१९-२0 अंतर्गत शून्य ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख ९ हजार ८२८ बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे. मोहिमेला यशस्वी करण्याकरिता जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग तयारीला लागले आहे. एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम १९ जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ डोज पाजण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी एकूण १ लाख ९ हजार ८२८ बालकांचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यात ९0 हजार ४१२ ग्रामीण तसेच १९ हजार ४१६ शहरी बालकांचा समावेश आहे. यासाठी ग्रामीण भागातील १ हजार २७९ व शहरी भागातील १२९ असे एकूण १ हजार ४0६ पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रेल्वेस्थानक, बस स्थानके व गर्दीच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करणार आहे. मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार ८२८ व शहरी भागात ३१५ असे एकूण ३ हजार १९५ आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, परिचारिका व आरोग्य विभागाचे अन्य कर्मचार्‍यांची ड्युटी लसीकरण मोहिमेसाठी लावण्यात येणार आहे.
आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांसह जिल्ह्यातील सर्व नागरिकांना देशाला पोलिओ मुक्त करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण राष्ट्रीय मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला १00 टक्के यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करुन देशाला पोलिओमुक्त करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाला १00 टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे सर्व शाळांना जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मोहिमेच्या एक दिवसाअगोदर ग्रामीण व शहरी भागातील शाळांद्वारे पल्स पोलीओ जनजागृती रॅली काढून नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे