राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन
गडचिरोली,दि.25: गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राज्याच्या तुलनेत मोठया प्रमाणात मतदान होते हा लोकशाहीचा विजय आहे. निवडणूक प्रक्रियेत काम करणारे पोलीस व निवडणूक कर्मचारी यांचे या दिनाच्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्ह्यात साजरा केला जातोय. जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी नवमतदार, अपंग मतदार, विविध स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक यांचा सन्मान केला.यावेळी निवडणूक प्रक्रियेत शहिद झालेलया कुटुंबांना व कर्मचारी यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमात मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेत काम करणारे बुथ पातळी ते जिल्हा स्तरावरचे अधिकारी ते कर्मचारी या सर्वांचे योगदान पारदर्शक निवडणूका पार पाडण्यात महत्वाचे आहे. यापुर्वी जिल्ह्यात निवडणूका म्हटंल की जीवीत हानीच्या घटना घडत होत्या. आता लोकशाही बळकट झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनातून 2019 साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत एकही जीवीत हानी झालेली नाही. यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यासाठी तुम्हा मतदारांचेही तेवढेच अभिनंदन.
या कार्यक्रमात पाच नवमतदार, पाच अपंग मतदारांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा सत्कार प्रशस्तीपत्रक देवून करण्यात आला. यामध्ये गुरवाळा शाळेतील शिक्षक ए.ए.देवळीकर, गडचिरोली नगरपंचायत शाळेतील पी.डी.रामटेके, येवली कृषी सहायक के.पी.सातार, शिवणी तलाठी एम.एन.भुरसे यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय मतदार दिवस व लोकशाही पंधरवडा यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजय झालेल्या स्पर्धकांनाही सन्मानित केले. यावेळी मलमपोंडू भामरागड येथे 2009 मधील शहिद पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांना उर्वरीत 10 लक्ष रुपयाचा धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले. त्याचवेळी विधानसभा निवडणूक 2019 मधील दिवंगत बापू गावडे यांचा आकस्मिक मृत्यु झाला होता. त्यांच्य कुटुंबियांनाही यावेळी 15 लक्ष रु.चा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ- ठुबे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.के.चडगुलवार यांनी केले. आभार तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर यांनी मानले.





