39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी न करण्याचे आवाहन

सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी न करण्याचे आवाहन

0
37

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यातील मुख्य रब्बी पिकांपैकी गहू हे प्रमुख पिक आहे. जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार ४१७ हेक्टर असून यावर्षी सरासरी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमानामुळे सर्वत्र सिंचनाचे स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तरीसुद्धा उपलब्ध स्रोतातील पाण्याचा अपव्यय न करता आता गहू पिकाची पेरणी न करांचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

गहू या पिकास सिंचनासाठी इतर रब्बी पिकांपेक्षा तसेच इतर उन्हाळी पिकांपेक्षा पाणी जास्त प्रमाणात लागते आणि या परिस्थितीत उशिराने करण्यात येणाऱ्या गहू लागवडीचा खर्च व नफा ताळमेळ पाहता त्यास लागणारा लागवड खर्च व मिळणारे उत्पन्न व त्यापासून मिळणारा निव्वळ नफ्याचा विचार करता गहू या पिकास इतर उन्हाळी पिकांच्या तुलनेत नफा अल्प प्रमाणात मिळतो.

कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहू पिकाची उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंतच करावी, तसेच या तारखेनंतर गव्हाची पेरणी करू नये. गहू पिकास पोषक ठरणारे १०० थंडीचे दिवस (७ ते २१ डिग्री तापमान) उशिराने पेरलेल्या गहू पिकास मिळत नसल्याने उशिरा पेरणी केलेल्या गव्हापासून चांगले उत्पन्न मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी करू नये. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य आणि परवडणारा वापर करण्यासाठी उन्हाळी तीळ (एकेटी-१०१, पीकेव्ही एनटी-११) उन्हाळी भुईमुग (टीए जी २४), उन्हाळी मुंग (पुसा, वैशाखी, पुसा ९५३१) या वाणांची निवड लागवडीसाठ करावी. गहू पिकाऐवजी शेतकरी बांधवांनी कृषि लागवड व अर्थशास्त्राचा विचार करून उन्हाळी पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार तसेच कृषि संशोधन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन काळाची गरज

उपलब्ध जलस्त्रोत हे सार्वजनिक संपत्ती व संसाधन आहे, त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात तर काहींना भरपूर प्रमाणात सिंचन दिल्यानंतरच या पिकांचे उत्पादन घेता येते. पाण्याच्या स्त्रोतांचे जतन व संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत कमी सिंचनात अधिक फायदा देणाऱ्या उन्हाळी पिकांची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.