अर्जुनी-मोर,दि.04ः- देशात ओबीसी प्रवर्ग सर्वात मोठ्या संख्येत आहे. हा समाज आजही मागास आहे. या प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात आली नसल्यामुळे नेमकी संख्या माहित नाही. त्यामुळे या समाजाला सोयी-सुविधांपासून वंचीत राहावे लागत आहे. २०२१ मध्ये जनगणना करण्यात येणार असून या जनगणनेत देखील ओबीसींकरिता स्वतंत्र रकाना ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी सेवा संघाच्या वतीने जनगणनेचे महत्व समजावून सांगण्याकरिता जिल्ह्यात उद्या ५ फेब्रुवारीपासून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.या जनगणना जागृती अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम तहसिल कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे,कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ.खुशाल बोपचे,अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी लांबट,ब्रम्हपुरीचे प्रा.नामदेवराव जेंगठे,ओबीसी जनगणना परिषद भंडाराचे सदानंद इलमे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही जनगणना अभिायान यात्रा प्रत्येक तालुक्यात जावून जनगणनेचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात ५ फेब्रुवारी रोजी अर्जुनी मोरगाव येथून दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.तालुका कार्यालयासमोरील यात्रेची सुरवात होणार असून ओबीसी जनजागरण यात्रा अर्जुनी-मोर येथील दुर्गा चौक,ताडगाव,झरपडा,धाबेटेकडी,ईटखेडा,खामखुरा,महागाव,सिरोली,केशोरी,बोंडगाव ,सुरबन, गोठणगाव मार्गे नवेगावबांध येथे रात्रीला पोचणार आहे.६फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता देवलगाव,कुंभीटोला,बाराभाटी,पिंपळगाव,अरततोंडी,निमगाव,बोंडगावदेवी,खांबी,चान्ना बाक्ट्टी,बोरटोल,सावरटोला,नवेगावबांध,पांढरवाणी,परसोडी मार्गे सडक-अर्जुनी तालुक्यात रवाना होणार आहे.या जनगणना जागृती यात्रेत ओबीसी,एस्सी,एसटी व धार्मिक अल्पसंख्यांक समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवासंघ,ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटना, सहयोगी संघटना मराठा सेवा संघ,जिजाऊ संभाजी बिग्रेड,संविधानिक मैत्री संघ,युवा बहुजन मंच तसेच ओबीसीतील सर्व जातीय संघटनाच्यावतीने करण्यात आले आहे.





