जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.निमगडे यांचे आवाहन
गोंदिया : 31 डिसेंबर 2019 पासून चीनमधील वुहान शहरात न्युमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून न्युमोनियाचे कारण नव्या प्रकाराचा कोरोना विषाणू असल्याचे सिध्द झाले आहे. सध्या चीनमध्ये कोरोना विषाणू आजाराचा उद्रेक सुरु आहे. चीन व्यतिरिक्त इतर 14 देशामध्येही या आजाराचे रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रवेश भारतात होवू नये यासाठी बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनींग तसेच प्रवाशांचे 28 दिवसाकरीता पाठपुरावा, लक्षणे आढळलेल्या प्रवाशांचे विलगीकरण आणि प्रयोगशाळा तपासणी इत्यादी उपाययोजना सुरु आहेत.
कोरोना हा एक विषाणू आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स यासारख्या गंभीर आजाराला कोरोना विषाणू कारणीभूत असतात. चीनमधील वुहान शहरात जो कोरोना विषाणू आढळून आला आहे तो मात्र यापूर्वी आढळलेल्या सहा-सात प्रकारच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. या नव्या विषाणूला नोवेल कोरोना व्हायरस 2019 (nCOV) असे नाव देण्यात आले आहे.
प्रतिबंधासाठी उपाययोजना- पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीशी निकटचा सहवास टाळावा. हातांची नियमीत स्वच्छता. न शिजलेले अथवा अपुरे शिजलेला मांस खाऊ नये. फळे व भाज्या न धुता खाऊ नये. खोकतांना शिकतांना नाका-तोंडावर मास्क रुमाल ठेवावे. नव्याने आढळून आलेल्या कोरोना विषाणूबाबत वरिष्ठ स्तरावरुन संचालकांचे सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग गोंदिया यांचेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्यास्थितीत गोंदिया जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. कोरोना बाधित देशातून आलेल्या प्रवाशांवर आरोग्य विभाग 28 दिवसापर्यंत लक्ष ठेवते. जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे संशयीत रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे. कोरोनाची भीती नको पण प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी केले आहे.




