33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ गोंदियातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतींच्या कामांसाठी त्वरित निधी द्यावा – नाना पटोले

गोंदियातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतींच्या कामांसाठी त्वरित निधी द्यावा – नाना पटोले

0
32

गोंदिया, दि. 5 : गोंदिया येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून रंगकाम, अंतर्गत सजावट आदींचे प्रलंबित कामासाठीचा निधी त्वरित वर्ग करावा, जेणेकरून उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार मार्चमध्ये इमारतीचे उद्घाटन होऊन कामकाज लवकरात लवकर सुरू होईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील न्यायालयाच्या इमारतीची दुरुस्ती व नवीन इमारतीसाठी निधी उपलब्धतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  गोंदिया येथे जिल्हा न्यायालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावट व रंगकाम प्रलंबित आहे. यासाठी सुमारे 4 कोटी 50 लाखाचा निधी अपेक्षित आहे. वित्त विभागाकडे विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवून हा निधी तातडीने देण्यासंबंधी कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. पटोले यांनी केली.
तसेच गोंदिया जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावर असलेल्या सडक अर्जूनी व अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयीन इमारत, गोरेगावमधील नवीन इमारत बांधणे, न्यायाधीशांच्या निवासी इमारती व जुन्या न्यायालयीन इमारतींचे दुरुस्ती व डागडुजी, भंडारा जिल्ह्यातील न्यायालयीन व निवासी इमारतीची दुरुस्ती आदी कामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सूचना श्री. पटोले यांनी यावेळी केली.