गोंदिया,दि.08ःवारंवार सूचना व निवेदन देऊनही नगर पंचायतीच्या कचरा गाड्या गावात शहरातील कचरा टाकत असल्याने, अखेरीस फुलचूरटोला ग्रामपंचायतीने नंपच्या ४ कचर्या गाड्या जप्त केल्या. यामुळे राज्यात ‘अ’ श्रेणी प्राप्त नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरातील कचर्याचे निर्मुलन करण्यासाठी डम्पींग यार्डचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, डम्पींग यार्ड तयार करण्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने पालिका प्रशासनातर्फे शहरातून गोळा केलेला कचरा शहरातील मोकळ्या जागेसह शहराला लागून असलेल्या गावखेड्यातील शिवारात टाकला जात आहे. फुलचूरटोलावासीयांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. फुलचूरटोला ग्रामपंचायतीने गोंदिया नगर परिषदेला गावशिवारात कचर्या टाकण्यासंदर्भात अनेकदा निवेदन दिले आहे. यापूर्वी एकदा कचरा गाड्यांवर कारवाई करीत दंडही वसूल केला आहे. मात्र, त्यानंतरही नगर परिषदेच्या गाड्या फुलचूरटोला परिसरात कचरा टाकत आहे. अखेरीस आज फुलचूरटोलाचे सरपंच जीवन बंसोड, ग्रापं सदस्य श्याम कावळे, दिनेश तिडके, गंगाधर बावनकर, स्वच्छता कर्मचारी सत्यम सोनवाने यांनी शिवारात कचरा टाकणार्या ४ गाड्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे नगर परिषदेच्या भोंगळ कारभार समोर आला आहे.





