33.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ 14 फेब्रुवारीला केटीएस रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर

14 फेब्रुवारीला केटीएस रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर

0
29

गोंदिया दि. ११ : : भारतामध्ये कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रारंभिक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होवू शकतो. यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 पासून ते दुपारी 2 पर्यंत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन दंत विभाग (क्र.22) ओपीडी परिसरात तपासणी करण्यात येईल. या शिबिरामध्ये लघवी आणि शौचच्या वेळी रक्त जाणे, वारंवार रक्ताची कमतरता होणे, थकवा तसेच कमजोरी येणे, खोकलतांनी रक्त येणे, स्तन भागी गाठ, मासिक पाळीच्या वेळी अती रक्तस्त्राव, गिळतांनी त्रास, गळ्यात किंवा शरीराच्या इतर ठिकाणी गाठ तसेच तोंडात पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंडातील 15 दिवसापेक्षा जास्त असलेली व्रण (जखम), जिभेवर किंवा गालावरील गाठ इत्यादी लक्षणे आढळल्यास तपासणी करुन निदान करण्यात येईल. या शिबिरामध्ये दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (वर्धा) येथील कर्करोग तज्ञ चमू व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ यावेळी सेवा देणार आहेत. तरी वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य‍चिकित्सक डॉ.भुषणकुमार रामटेके यांनी केले आहे.

17 फेब्रुवारीला महिला लोकशाही दिन

गोंदिया : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी व अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये सर्व महिला कर्मचारी, महिला मंडळ, बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येवून वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, खोली क्र.36, जयस्तंभ चौक, गोंदिया या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गोदिया येथे संपर्क साधावा.

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू      

गोंदिया : 13 ते 27 फेब्रुवारी 2020 या कालावधीत जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहे. तसेच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व 21 फेब्रुवारीला महाशिवरात्री हा सण जिल्ह्यात साजरा करण्यात येणार असून ठिकठिकाणी त्यानिमीत्त यात्रा भरणार आहे. त्‍यादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुरक्षीतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने 13 फेब्रवारी पासून ते 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे ज्यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

बारावी व दहावीची परीक्षा परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

गोंदिया : 18 फेब्रुवारीपासून ते 23 मार्च 2020 पर्यंतच्या कालावधीत एच.एस.सी. आणि एस.एस.सी. परीक्षा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. हा आदेश 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 23 मार्च 2020 रोजी सायंकाळी   7 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.