गोंदिया,दि.13 : जिल्ह्यातील 1 लाख 98 हजार 746 शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असून वेगवेगळ्या वित्तीय संस्था व बँकांकडून यापैकी 70 हजार 902 लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज न घेतलेले 1 लाख 27 हजार 844 पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी जिल्हयामध्ये वंचित आहेत. या शेतकऱ्यांना बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभाग यांचेकडून आदेश प्राप्त झाले आहेत.
या शेतकऱ्यांना सुलभरीत्या अर्ज करता यावे, याकरिता इंडियन बँक असोशिएशन द्वारा एक अर्जाचा नमूना (लाभार्थी शेतकरी) सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत सातबाराचा उतारा आणि कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेवून ज्या बँकेमधून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा बँकेत संपर्क करावा.
कोणत्याही वित्तीय संस्था व बँक येथे पीक कर्ज नसणाऱ्या पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसींग चार्जेस व निरीक्षण खर्च हा बँकेकडून माफ करण्यात येणार आहे. भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह प्राप्त झाल्यापासून 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्या पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकाकडून पीक कर्ज घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक उदय खर्डेनवीस व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे यांनी केले आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.




