मुंबई विद्यापीठास पहिल्यांदाच अन्वेषण स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान
मुंबई,दि.१९ फेब्रुवारी- जिज्ञासेपोटी केलेल्या संशोधनातून अनेक महत्वाचे शोध लागले आहेत. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता संशोधनात असून, समाजजीवन सुसह्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. अनिरूद्ध पंडित यांनी केले. भारतासमोर अनेक आव्हाने आहेत, अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले संशोधन त्या दिशेने असायला हवे असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही संशोधनाची शेवटी उपयोगिता ही महत्वाची बाजू असल्याने प्रत्येकांनी तसा दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ते आज मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्यीय विद्यापीठ विद्यार्थी संशोधन स्पर्धेचे (अन्वेषण ) २०१९-२० च्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिताना संबोधित करीत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, एआययुचे डॉ. अमरेंद्र पानी, डॉ. नेगी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यानगरी संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, समाजाला दैनदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी व सर्वसामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्यासाठी समाजपयोगी संशोधनाची नितांत गरज आहे, त्यासाठी अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी ही मोठी संधी आहे. विद्यापीठाने सुरुवात केलेल्या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून अशा नवसंशोधकांना मोठी मदत मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागीय क्षेत्रातून महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात राज्यातील एकूण १४ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली आहेत. भारतीय विद्यापीठ संघ ( एआययु) आणि मुंबई विद्यापीठाच्या सयुंक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी उपलब्ध करुन देणे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधीची उपलब्धता करुन देणे, संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढविणे अशा महत्वाकांक्षी उद्देश्यासह २००८ पासून विद्यार्थी संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. अन्वेषण या स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान मुंबई विद्यापीठाला पहिल्यांदा मिळाला आहे. शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र,सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी या पाच वर्गवारीतून या स्पर्धेत पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरण या दोन वर्गवारीतून स्पर्धकांना सादरीकरण करावे लागत असून, स्पर्धेतील प्रत्येक पातळीवरच्या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविन्यात येणार आहे.





