गोंदिया,दि.21 : जिल्ह्यात महाशिवरात्री निमित्त मुख्यत: छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध तिर्थस्थळ प्रतापगडसह ३० हून अधिक ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळपासूनच शिव भक्तांमध्ये दर्शनाची लगबग पाहावयास मिळाली. तिर्थस्थळाला जाणार्या सर्व मार्गांवर वाहन व पायी जाणार्या शिव भक्तांची गर्दी होती. त्यातच संपूर्ण जिल्हा हर बोला ‘हर-हर महादेव…’ या जयघोषाच्या निनादात गजबजला. मुख्यत: जिल्ह्यातील नागरा व प्रतापगड, पोंगेझरा (बोळुंदा) मांडोदेवी या प्रमुख तीर्थस्थळासह ठिकठिकाणच्या शिव मंदिरात लाख-हजारोंच्या संख्येत भाविकांनी हजेरी लावून पूजा-अर्चना केली.
मागील अनेक दिवसांपासून महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त तिर्थस्थळांवर यात्रेच्या आयोजनासाठी मंदिर समिती, सामाजिक संघटना, शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर जिल्ह्यात हिंदु व मुस्लिम धर्मीयांचे एकतेचे प्रतिक तिर्थस्थळ प्रतापगड, हिरडामाली, बोळुंदा, नागरा, कटंगी/गोरेगाव, मांडोदेवी, पांगडी, पिंडकेपार, भानपूर, किंडगीपार, कोरणीघाट, टेमनी, तिडका, राका/कालीमाटी, कवलेवाडा/हळदीघाट, पाटेकुर्रा, बेलापहाडी, चोरखमारा, हौशीटोला, डोमाटोला, कारंजा, नवाटोला, या प्रमुख तिर्थस्थानासह एकूण ३० हून अधिक तीर्थक्षेत्रात यात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून भाविकांनी महादेवाचे दर्शनासाठी तीर्थस्थळी हजेरी लावली. भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण जिल्हा हर बोला ‘हर-हर महादेव’ या जयघोषाने गजबजला. 
सकाळपासून तीर्थस्थळावर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे दिसून आले. हवन, पूजन, शिवलिंग अभिषेक आदी कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेतला. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ प्रतापगड येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हिंदू भाविक, तर हजरत ख्वाजा हारुनी गणी यांच्या वार्षिकोत्सव उर्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुस्लिम भाविकांनी आजपासून एकच गर्दी केली. लाखोच्या संख्येत आलेल्या भाविकांमुळे प्रतापगड परिसर आणि अर्जुनी/मोरगाव तालुका महादेवांच्या जयघोषाने गजबजला होता.
दोन दिवसीय यात्रेत आज गर्दी असली तरि दुसर्या दिवसी देखील लाखोंहून अधिक भाविक तीर्थस्थळी हजेरी लावतील असा अंदाज वर्तविला जात आहे. महाशिवरात्री च्या पर्वावर महादेव दर्शनासाठी नागरिकांची मुख्य मार्गांवर चांगलीच वर्दळ दिसून आली. तीर्थस्थळी भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्वच ठिकाणी समाजसेवी संघटनाचे पदाधिकारी, जनप्रतिनिधी, व शासकीय यंत्रणेचे अधिकारी कामाला लागले होते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी महाप्रसाद, पाणी पाऊच, शरबत वितरण देखील करण्यात आले. यात्रे दरम्यान जिल्ह्यात कोणत्याही तीर्थस्थळी अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषत: प्रतापगड हे तीर्थस्थळ अतिसंवेदनशील क्षेत्रात येत असल्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
वर्षा पटेल यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण,शिव पूजन व दर्गाहवर चादर चढविली
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त प्रतापगड येथील यात्रास्थळी स्व. मनोहरभाई पटेल एकेडमीच्या वतीने महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी एकेडमीचे अध्यक्ष वर्षाताई पटेल यांनी भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी महादेव पहाडीवर जावून भगवान शिव यांचे पूजन करून जिल्ह्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्राथना केली. त्यानंतर ख्वाजा हारुनी गणी यांच्या दर्गाहवर जावून चादर चढविली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, राजु एन.जैन, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, यशवंत गणवीर, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, सोमदास गणवीर, राकेश जायस्वाल, यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. दरम्यान सौ. वर्षाताई पटेल यांनी स्वत: भाविकांना महाप्रसाद वितरण केले.
सोयी-सुविधेसाठी प्रशासन सज्ज
ठिकठिकाणच्या मंदिरात येणार्या भाविकांच्या सेवेसाठी जनप्रतिनिधी, विविध समाजसंघटनेचे पदाधिकारी, समाज सेवक व शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. विशेषत: तीर्थस्थळावर भाविकांची गैरसोय व कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिस यंत्रणासह स्थानिक तालुका प्रशासन तैनात दिसून आले.
महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांना वेळेवर आणि सोयीचे आणि सुरक्षिततीने प्रवास करून महादेव दर्शनाला जाता यावं यासाठी २४ तास बसेसची सेवा उपलब्ध महामंडळातर्पेâ करण्यात आली. यात साकोली आगाराकडून ३०,पवनी आगाराकडून ७ ,भंडारा आगाराकडून ७ ½ व गोंदिया आगाराकडून ५ बस फेर्या प्रतापगड यात्रेसाठी सुरू करण्यात आले आहे. ह्या बस फेर्या धावणार आहेत. यात्रेच्या शेवटपर्यंत प्रत्येक पंधरा मिनिटाला अर्जुनी मोरगाव बसस्थानकावरून तसेच प्रतापगड क्षेत्रातील इतर बसस्थानकावरून एसटी. बसची सेवा पुरविण्यात येत आहे.
मनसेच्यावतीने फळवितरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे २१ फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त तीर्थक्षेत्र शिवधाम पिंडकेपार येथे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली फळ वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुका अध्यक्ष सूरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, शहर सचिव चंदु बडवाईक, किशोर ठाकुर प्रल्हाद बागडे, आकाश कटरे, माधव बनकर, सुभाष राऊत, निखलेश राऊत, सागर गौतम, महिला सेना जिल्हा अध्यक्ष हिमेश्वरी कावडे, वनीता नागोसे रेखा लालवानी, रजनी टिकारीया सुरेखा भांडारकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




