संख,दि.21 :सांगली जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याबद्दल बाबरवस्ती (ता. जत ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील 40 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.राज्य शासन, शिक्षण विभाग व मुंबई येथील सलाम फाऊंडेशन यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे.
पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील विद्यार्थी व्यसन मुक्ती करण्यासाठी धडपडणारे अशी ओळख आहे.शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परिजनाची व्यसनमुक्ती हा उपक्रम राज्यभर राबविला आहे. गटशिक्षणाधिकारी आर .डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबरवस्ती शाळा उपक्रमात सहभागी झाली होती.मूल्यवर्धन मुथ्था फाऊंडेशन व सलाम मुंबई फाउन्डेशन,प्रकल्प समन्वयक अजय पिळणकर यांनी व्यसन मुक्त उपक्रमसाठी मार्गदर्शन केले होते.
उपक्रमांतर्गत विद्यार्थीनी आई-वडील, नातेवाईक यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन व्यसनमुक्तीचे फायदे-तोटे समजावून सांगितले.व्यसनमुक्ती केली.प्रस्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ म्हणाले, व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यासाठी शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे. याचा वापर करून आपण जग बदलू शकतो. शाळेत दिले जाणारे शिक्षण ,संस्कार हे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य घडवत असतो.असे मत व्यक्त केले.
गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे म्हणाले, व्यसन समाजाला लागलेली कीड आहे.निरोगी आयुष्य जगण्यासाठी माणसानं निर्व्यसनी असणे गरजेचे आहे.व्यसनापासून होणारे दुष्परिणाम, व्यसनाची दाहकता बालवयातच विद्यार्थ्यांना समजली तर नक्कीच भविष्यात ही आजची पिढी निर्व्यसनी जीवन जगेल असे मत व्यक्त केले.अप्पर तहसिलदार प्रशांत पिसाळ, गटशिक्षणाधिकारी आर. डी .शिंदे यांच्या हस्ते मुख्याध्यापक दिलीप वाघमारे,सहशिक्षक अनिल पवार यांना व्यसनमुक्तीचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.सलाम मुंबईचे प्रकल्प समन्वयक अजय पिळणकर ,केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सविता मोटे,उपाध्यक्ष ललिता बाबर ,ग्रामस्थ ,माता पालक उपस्थित होते.सुञसंचलन अभिजीत माळगोंडे यांनी केले.आभार अनिल पवार मानले.





