नागपूर,दि.२१~पाटबंधारे विभागाकडून नाल्यावरील बंधार्याचे काम सुरू असताना मातीचा मलबा खसल्याने ४ महिलांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर तीन महिला जखमी झाल्याची घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-कळमेश्वर मार्गावरील आदासा पटकाखेडी शिवारात शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी घडली. मृतकांमध्ये वर्षा शामलाल मडावी (२६), अनुसया हिरदेय टेकाम (४५), सुनीता कैलास (३५), रामप्यारी उदयसिंग काकोरिया (१८) अशी मृतकांची नावे आहेत. हे सर्व टाकला, तालुका बरघट, जिल्हा शिवनी येथील रहिवासी आहे.
पाटबंधारे विभागाकडून स्मॉल स्केल एरिकेशन कंपनी नागपूरच्या माध्यमातून नाल्यावरील बंधार्याचे काम सुरू होते. घटना घडल्यानंतर स्थानिक ठेकेदारांनी मृतक ३ कामगारांना घटनास्थळवरून सरळ तहसील बरघाट, जिल्हा शिवनी येथे त्यांचा परिजनांकडे गाडी करून रवाना केले. तर जखमी महिलांना उपचाराकरिता नागपूर येथे रवाना केले. सावनेर पोलिसांनी ठेकेदार मनदीप चौधरी आणि अभियंता जगदीश प्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून, आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर बंधार्याच्या कामावर २५ ते ३0 मजूर गेल्या १0 दिवसांपासून काम करीत होते. घटनेच्या वेळी बंधार्याचे २0 फूट लांबीचे तर ८ ते ९ फूट खोलीचे कार्य पोकलेंडच्या माध्यमातून सुरू होते. मात्र, सुरक्षेची कुठलीच उपाययोजना न करता सदर खड्याचे खोदकाम सुरू होते. आज सकाळी महिला कामाच्या ठिकाणी पोहोचत नाही तोच मातीचा ढीग त्यांच्या अंगावर पडल्याने यात गुदमरून चार महिलांना प्राण गमवावे लागले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. घटनेची माहिती सावनेर पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून सायंकाळी साडेसात वाजतादरम्यान कंत्राटदार आरोपी मनदीप चौधरी (२५), रा. राजस्थान व अभियंता जगदीश प्रसाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





