गोरेगावः नागपूर येथील प्रसिद्ध सातवचन बँक्वेट हॉलमध्ये १४ जून रोजी आयोजित स्टार वॉक पूनम प्रोडक्शनच्या ६ व्या ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ ब्युटी पेगेन्ट फॅशन रनवे स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत पाथरी येथील रूपाली पारधी हिने ‘मिस’ विभागात’ फर्स्ट रनर अप’चा किताब पटकावला आहे. रूपाली पारधी हिच्या कामगिरीने गोरेगावसह जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
आयोजिका पूनम गोकुलपुरे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील जिल्हावार स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात १६ नामांकित ड्रेस डिझायनर्सनी आपल्या डिझाइन्सचे प्रदर्शन केले. परीक्षक म्हणून छत्तीसगडच्या आलिया परवीन,दिल्लीचे गगनदीप सिंग, डॉ. रिचा जरिया व डायरेक्टर प्रदीप पाली उपस्थित होते. तर स्पर्धकांना आकाश मेघवानी, साक्षी बहल आणि अन्सारी सर यांनी ग्रुमिंग दिले. या सोहळ्यात बिहारची प्रसिद्ध अभिनेत्री आईना सिंग यांच्या हस्ते रूपाली पारधीला फर्स्ट रनर अप चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रूपालीच्या या यशाने फॅशन क्षेत्रात गोंदिया जिल्ह्याचा गौरव वाढला असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.





