31.7 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता कवलेवाड्याच्या धरणात खळबंद्यातील युवकाचा मृतदेह आढळला

कवलेवाड्याच्या धरणात खळबंद्यातील युवकाचा मृतदेह आढळला

0
27

तिरोडा,दि.22ः-येथून जवळच असलेल्या वैनगंगा नदीवरील पिपरीचुन्नी गावालगतच्या कवलेवाडा धरणात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. निरज राजकुमार वासनिक (२२) रा. खळबंदा (गोंदिया) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
वैनगंगा नदीवरील कालेवाडा धरणात पाणी तुडूंब भरले आहे. नदी पात्रात २५ किलोमीटर लांब अंतरापयर्ंत पाणी भरून असल्याने पात्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही आज पिपरीचुन्नी गावाशेजारी वैनगंगा नदी पात्रातून तुमसर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पंपगृहालगत तरुणाचे प्रेत पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने गावातील नागरिकांनी धाव घेतली. रोजगारा निमित्त नागपूरला वास्तव्य करीत असलेला नीरज एका कंपनीत ऑपरेटर या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. परंतु, तो गेल्या तीन दिवसांपासून नागपुरातून बेपत्ता होता. यामुळे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन धानोली येथे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
कवलेवाडा धरणापासून नागपूर आणि खळबंदा गावाचे अंतर लांब असल्याने व निरजचा मृतदेह धरणातच तरंगतांना आढळल्याने तर्क-वितर्कांना पेव फुटले आहे. घटनेच्या काही अंतरावरच परसवाडा गावात मृतक नीरजची बहीण वास्तव्यास आहे. परंतु, तो बहिणीच्या घरी आला नसल्याची माहिती आहे.
सिहोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. मृतकाच्या खिशात मिळालेल्या कंपनीचे ओळखपत्रानुसार त्याची ओळख पटली आहे. त्या आत्महत्या केली की, घातपात करण्यात आला आहे, अशा चर्चा परिसरात सुरू असल्या तरी पोलिस तपासात ते निष्पन्न होणार आहे. घटनेचा तपास पोलिस स्टेशन सिहोराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार मुलचंद मेर्शाम करीत आहेत.