;आरोपी भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात
अर्जुनी-मोर,दि.१७ः-तालुक्यातील परसटोला येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून) सकाळी घडली. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून आरोपी भावाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मोहन मंगरू कवडो (वय ४७, रा. परसटोला, ता. अर्जुनी-मोरगाव) व आरोपी नारायण मंगरू कवडो (वय ४४, रा. परसटोला) हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांनी दोघांनाही शेतीची वाटणी करून दिली होती. मात्र वडिलांचा सांभाळ मृतक मोहन कवडो करीत असल्याने वडिलांच्या हिस्स्यातील चार बांद्या तोच पेरत होता.बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास मोहन कवडो हे पत्नीसमवेत शेतात गेले असता आरोपी नारायण कवडो तेथे आला. वडिलांच्या हिस्स्यातील बांद्या मला द्याव्यात, या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले असता आरोपीने संतापाच्या भरात कुऱ्हाडीने मोहन कवडो यांच्या दोन्ही पायांवर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. रक्तस्त्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो (वय ४०) यांनी केशोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी नारायण कवडो याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





