गोंदिया,दि.22ःऑटो चालकाने दाखविलेल्या समयसूचकता व पोलीसांच्या तत्परतेमुळे अवघ्या २0 मिनिटात हरविलेला १ वषार्चा चिमुकल्याला त्याचे आईबाबा मिळाले. ही घटना २0 जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. मनीष सोविंदा डोंगरे रा.दासगाव खुर्द असे ऑटो चालकाचे नाव आहे, तर योगांश उर्फ कान्हा राजेश माने रा.मरारटोली असे चिमुकल्याचे नाव आहे.
ऑटोचालक मनीष डोंगरे हा जिल्हाधिकारी कार्यालय ते बालाघाट टी पाइर्ंट मार्गे कुडवाकडे आपला ऑटो नेत असताना त्याला रिंगरोडवरील रेल्वे चौकीजवळ १ वषार्चा चिमुकला रडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ऑटो थांबवून चिमुकल्याला जवळ घेतले व परिसरात त्याच्याबद्दल चौकशी केली. मात्र काहीच माहिती मिळत नसल्याचे पाहून त्याने तातडीने चिमुकल्याला गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले व घडलेला प्रकार सांगितला. पोलीसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चिमुकल्यासह ऑटोचालकाला पोलीस गाडी बसविले व चिमुकल्याला जेथून ऑटोचालकाने आणले होते, ते स्थळ गाठले. ते स्थळ व परिसरात पोलीस वाहनातील ध्वनीक्षेपणातून घटनेची माहिती नागरिकांना दिली. यावेळी काही नागरिकांनी चिमुकला हा मरारटोली येथील साईनगरातील राजेश माने यांचा मुलगा असल्याचे सांगितले. दरम्यान पोलीसांनी राजेश माने यांचे घर गाठले व खातरजमा केल्यावर चिमुकल्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, ऑटोचालकाची समयसूचकता, सामाजिक बांधिलकी व पोलीसांची कर्तव्य तत्परतेमुळे अवघ्या २0 मिनीटात चिमुकल्या कान्हाला त्याचे आईबाबा भेटले.
यासाठी ऑटो चालक मनीष डोंगरे यांच्यासह पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप अतुलकर, अभिजीत भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास थेर, पोलीस हवालदार मिलकीराम पटले, पोलीस शिपाई रुपेश कटरे, प्रमिल ताराम, घनश्याम कुंभलवार यांचे कान्हाच्या पालकांसह नागरिकांनी आभार व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.




