गोंदिया दि.२९–: गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना अनेक तलावांचे बांधकाम झाले. त्यामुळेच या जिल्ह्यांना तलावांचा जिल्हा व धानाचा कटोरा अशी प्रसिद्धी मिळाली. केंद्र शासनानेही मागील वर्षांत ग्रामीण पाणलोट कार्यक्रम पेयजलासाठी महाजल योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंग्रहाच्या योजना लागू केल्या. आता नवीन शासनाने त्याच योजनांचे नाव बदलवून नवीन नाव जलयुक्त शिवार योजना ठेवले आहे, केवळ योजनेचे नाव बदलणे म्हणजे विकास का? असा सवाल आ.गोपालदास अग्रवाल यांनी केला.
हलबीटोला (खमारी) येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ.गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते तलाव खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आ.अग्रवाल म्हणाले, जल जीवन आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना शक्य नाही. काँग्रेसच्या काळात केंद्र व राज्य सरकारने या दिशेने सर्वाधिक काम केले. जिल्ह्यातील वाघ इटियाडोह धरण, कालीसराड धरण, कटंगी धरण, चुलबंद धरण यासारख्या अनेक धरणांचे बांधकाम करून जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या.
नाव कोणतेही असो, त्यात काही ठेवले नसते. परंतु आमचे पूर्ण प्रयत्न सतत या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात कृषी क्षेत्राला सिंचनाचे नवीन साधन मिळावे, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांचे दरवर्षी एक-दोन पाण्याने पीक मार खाते ते वाचविण्यासाठी सुरू आहेत. अशा अनेक सिंचन क्षेत्रांना मजबूत करण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. नुकतेच गोंदिया पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून खमारी येथील तलावाच्या जीर्णोद्धाराचे कार्य मंजूर झाले आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी अग्रवाल यांनी उपस्थित उपविभागीय अधिकारी केएनके राव व तहसीलदार पवार यांना भरतनगर येथील अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देण्याची मागणी केली. यावर केएनके राव यांनी परिसरात विकास कार्यांसाठी महसूल विभागाच्या वतीने शक्त ते सहकार्य दिले जाईल, तसेच अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देण्याच्या कामाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगितले. यानंतर कृउबासचे संचालक विठोबा लिल्हारे यांनी जि.प. व पं.स. निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना विकासासाठी निवडणूक आणा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात कनिष्ठ अभियंता वासुदेव रामटेककर, सरपंच उर्मिला तावाडे, उपसरपंच कैलाश साखरे, ग्रा.पं. सदस्य हेमलता नाईक, लिखीराम मानकर, लक्ष्मण नाईक, बबिता कटकवार, निलकंठ मसराम, मिलनराव कांबडे, पौर्णिमा रामटेके, सचिन मेश्राम, विमला तावाडे, महेंद्र बनकर, महेंद्र मेंढे, आशा तावाडे, मनोहर नागरिकर, निर्मला गोस्वामी, रामसिंह परिहार, अशोक लिचडे, अशोक इटानकर, अन्ना बहेकार, रोहिनी रहांगडाले, नाईक गुरूजी, पिंटू कठाने व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





