भंडारा,दि.07ः लग्नातील वर्हाडी बनून धडाक्यात सुरू असलेल्या वाळू घाटावर खुद्द पोलिस अधीक्षकांनी धाड मारून तीन कोटी ६0 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात १0 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री पवनी तालुक्यातील खातखेडा येथील घाटावर करण्यात आली. या कारवाईमुळे रेतीमाफियांच्या उन्मादाला चाप बसल्याच्या प्रतिक्रि या येत आहेत. रेती चोरीविरोधात जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
मागील कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाट बंद आहेत. मात्र, तरीसुद्धा मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वात एक बैठक घेऊन अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. वाळू माफियांनी या अधिकार्यांवर पाळत ठेवण्यासाठी तीन ते चार हजार रुपये रोजीचे माणसं प्रत्येक गावात ठेवलेले आहेत. त्यामुळे अधिकारी कारवाईसाठी निघताच त्याची माहिती लगेच घाटावर पोहोचते आणि अधिकार्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.
यावर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नामी शक्कल लढवत खासगी वाहनातून घाटावर जाण्याचे ठरविले. त्यासाठी एका वाहनाला नवरदेवाच्या वाहनाप्रमाणे सजविले. आणि तीनही वाहनांवर ‘मॅरेज पार्टी सहपरिवार’ असे बॅनर लावून मध्यरात्रीच्या सुमारास १५ जणांच्या चमूने खातखेडा वाळू घाटावर धडक दिली.
या कारवाईमध्ये तब्बल ८ जेसीबी, १२ टिप्पर असे एकूण ३ कोटी ६0 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक, मालक असलेल्या दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हा अवैधरित्या वाळू घाट चालविणारा माफिया कोण? याची माहिती मिळाली नाही. त्याला अटक करून त्याच्यावरही कारवाई होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतरही ठिकाणी अवैध वाळू घाटावर अशाच पद्धतीने कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाळू माफिया सैरभैर झाले आहेत. या कारवाईत जेसीबी चालक परसराम महादू महादे रा. सोनेगाव, टिप्पर चालक लिखीराम बस्तीराम शेंद्रे बीडगाव, दीपक मधुकर शेंडे रा. कळमना नागपूर, शरद देविदास कुरुडकर, रा. डोंगरगावमेनसिंग मंगलसिंग खंडाते रा. साईबाबानगर नागपूर, स्वप्नील नथुजी मांढरे रा. पाचगाव, शिशिर नीळकंठराव झाडे रा. टाकडी नागपूर, लियाकत अली मुबारक अन्सारी रा. साईबाबानगर नागपूर, नौशाद राहेम्तुल्ला खान रा. रोशनबाग खरबी, नागपूर यांना अटक करण्यात आली असून दहा जण फरार आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. चंद्रशेखर चकाटे यांचे तक्रारीवरून पवनी पोलिसात कलम ३७९, ३४ भादंवि सहकलम ४८ (७) (८) महाराष्ट्र महसूल संहिता १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.




