33.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करा व काळजी घ्या;जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन

कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करा व काळजी घ्या;जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन

0
345

गोंदिया ,दि.14: जगभरात सद्यस्थितीत कोरोना या विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कोरोना हे विषाणुच्या एका समुहाचे नाव असून 31 डिसेंबर 2019 रोजी चीन देशातील वुहान शहरात नविन कोरोना विषाणुचा उद्रेक घोषित करण्यात आला. त्यानंतर चीनच्या इतर शहरात आणि प्रांतातही या आजाराचे रुग्ण आढळले. या रोगामुळे संक्रमीत झालेले रुग्ण भारतासह जगातल्या 88 देशात आढळले आहे. तसेच जगात लाखो लोकांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व आपली काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

भारतात परदेशी नागरिकांसह या आजाराचे एकूण 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सदर आजारास जागतिक आणीबाणी 30 जानेवारीला घोषित केली आहे. कोरोना विषाणु हा नविन कोरोना विषाणु-2019 n CoV आहे. त्याची संरचना काटेरी मुकूटाप्रमाणे असून आकार 400 ते 500 मायक्रॉन आहे. हा विषाणु शिंकल्याने किंवा खोकल्याने एक दुसऱ्यापर्यंत पोहोचतो. परंतू हा विषाणु आकाराने मोठा असल्याने फार लांब पसरु शकत नाही. हा विषाणु नविन असल्याने अजुनही खात्रीचे औषध व लस उपलब्ध नाही. कोरोना विषाणुच्या आजाराची लक्षणे मुख्यत: श्वसन संस्थेशी निगडीत आहे. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया होणे, कोरोना विषाणुमुळे होणारा आजार कसा पसरतो याबाबत संदिग्धता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक असल्यामुळे केंद्र सरकारने बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबई, दिल्ली व देशातील इतर विमानतळावर सुरु केले आहे.

उपाययोजना व घ्यावयाची काळजी– सदर आजाराचा प्रादुर्भाव 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, दिर्घकाळापासून आजारी असणारे व प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्या लोकांना होतो. प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमीतपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकतांना, खोकतांना नाक व तोंडावर रुमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक, डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास व अंडी पूर्णपणे शिजवून खावे. जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास नजिकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रशासनाने केलेल्या उपाययोजना– जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 व्हेंटीलेटर व 4 खाटांसह आयसोलेशन कक्ष स्थापित करण्यात आला  आहे. तसेच सहयोग हॉस्पीटल गोंदिया या खाजगी रुग्णालयात 5 खाटा व 3 व्हेंटीलेटर राखीव ठेवण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना जंतू संसर्ग झालेला आहे किंवा नाही यासाठी निरिक्षणामध्ये 14 दिवस ठेवण्याकरीता क्वारनटाईन कक्ष स्थापित करण्यात आला आहे. संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला भरती करुन प्रयोगशाळेत तपासणी करुन रिपोर्ट येईपर्यंत त्या रुग्णालयात भरती ठेवले जाते. संशयीत रुग्णाच्या नमून्याची तपासणीकरीता नागपूर येथे आय.जी.एम.सी.मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठविला जातो. तसेच ही तपासणी मुंबई व पुणे येथे प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. बाधित रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा रुग्णालय आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावून फिरण्याची गरज नाही. परंतू चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना अनावश्यक स्पर्श करु नका. सकस आजार घ्यावा. वैयक्तीक स्वच्छता ठेवावी. वारंवार हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा. जेवणाआधी व शौचावरुन आल्यानंतर तसेच सार्वजनिक ठिकाणी वस्तू हाताळल्यानंतर हात धुवावे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, पण खबरदारी निश्चित घ्यावी. अफवांना बळी पडू नये. तसेच समाज माध्यमांवर अफवा पसरवू नये. कोरोना विषाणु संसर्गजन्य असल्याने सार्वजनिक जत्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया यांनी केले आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

 गोंदिया : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशात कोरोना विषाणु संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. राज्यात पुणे व मुंबई या शहरामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यातही कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळले आहे. कामानिमीत्त/व्यवसायानिमीत्त या जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात येणे-जाणे सुरु असते. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयीत रुग्ण गोंदिया जिल्ह्यात आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. संशयीत रुग्णामुळे आपत्तीजनक परिस्थिती गोंदिया जिल्ह्यात उदभवू नये यासाठी या पार्श्वभूमीवर पुर्वतयारी करण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा  जिल्हादंडाधिकारी हे या प्राधिकरणचे पदसिध्द अध्यक्ष आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी हा कायदा जिल्ह्यात लागू झाल्याचे या आदेशाद्वारे घोषित केले आहे. पुर्वतयारी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी इन्सीडेन्ट कमांडर म्हणून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगीता पाटील (9423374039) व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांना सनियंत्रक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे.