41.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ ‘कोरोना’बाबत व्यापक जनजागृती करा-जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

‘कोरोना’बाबत व्यापक जनजागृती करा-जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
340

गोंदियादि. १८ : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रती दक्ष राहावे. कुणालाही या विषाणूचा संसर्ग होणार नाही, यासाठी ‘कोरोना’बाबत व्यापक जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.

१७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना डॉ. बलकवडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता पाटील, गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, पोलीस निरीक्षक श्री. मेंढे यांची उपस्थिती होती.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, गोंदिया येथील मरारटोली येथील नगरपरिषदेच्या शाळेतील आणि लहीटोला येथील विलगीकरण कक्षामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच औषधाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. शहरात कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यावर असलेल्या ध्वनीक्षेपकावरून ऑडिओ जिंगल्सच्या माध्यमातून शहरी भागात ‘कोरोना’बाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद करण्यात यावे, असे निर्देश दिल्याचे सांगून डॉ. बलकवडे म्हणाल्या, जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात देखील ‘कोरोना’च्या रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या बंद असल्याची खातरजमा करण्यात यावी. आरोग्य विभागाने आपली पथके सुसज्ज ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले.