पुणे(वृत्तसंस्था)दि.18ः –पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलल्या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 4 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, विवेक विचारमंच संस्थेचे सदस्य सागर शिंदे यांनी शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आयोगाच्या वतीने साक्षसाठी कोणती तारीख सोयीस्कर आहे.याबाबत शरद पवारांकडे विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी 4 एप्रिल ही तारीख दिली. त्यानुसार शरद पवार 4 एप्रिल रोजी आयोगासमोर साक्ष देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवाम मलिक पुढे बोलताना म्हणाले की, याआधी देखील आयोगाची मुदत संपली होती. त्यांना मुदतवाढ देण्यात आली. 4 तारखेला शरद पवारांची साक्ष आहे. तर 8 तारखेला आयोगाची मुदत संपत असली तर निश्चित रुपाने सरकारने त्याबाबत विचार करून मुदतवाढ देईल. आयोगाने त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या रिपोर्टनंतर सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल.
मलिक म्हणाले की, चौकशी आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील माहिती मागितली होती पण ती त्यांनी दिली नाही. शरद पवारांनी स्वतः माहिती दिली होती. शरद पवारांची जी काही भूमिका असेल ती ते आयोगासमोर ठेवतील. ज्यांनी ही मागणी केली त्यांची भूमिका काय ते काय बोलतात याबाबत आम्ही बोलणार नाही.





