
गोंदिया दि.19:जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.जिल्ह्यात कलम 144 चे आदेश लागू करण्यात आले आहे. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी हिरवा भाजीपाला,हिरवी मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी,वांगे, टमाटे,बटाटे, काकडी, अन्य कृषी उत्पादने विक्रीसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी. या जागेमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवण्याची जागा आणि खरेदीदारांची जागा बॅरिकेट्स लावून सामाजिक अंतर ठेवून निश्चित करावी.
आवारातील प्रत्येक दुकानापुढे बॅरिकेट्स लावण्यात यावे.गर्दी टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागांचे सपाटीकरण करून तेथे विक्रीस उपलब्ध करून द्यावे. दोन्ही बाजूला मोठ्या टाक्या असलेले व हाताचा स्पर्श होणार नाही अशा हँडवॉश स्टेशनची व्यवस्था करावी.प्रत्येक दुकानासमोर 1 मीटर अंतराने ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग करावे.बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नाक,तोंड झाकण्यासाठी मास्क अथवा सुती रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे.
आवारामध्ये येणाऱ्या हातगाडी, मालवाहतूक करणारी तीन चाकी वाहने, चार चाकी छोटी वाहने,मेटाडोर्स, ट्रक्स इत्यादीसाठी वेगवेगळे पार्किंग क्षेत्र निश्चित करावे. पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्किंग होतील याची खबरदारी घ्यावी. आवारात सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे.गर्दीच्या नियंत्रणासाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमावे. आवारामध्ये भाजीपाल्याच्या किरकोळ खरेदी/विक्रीस प्रतिबंध करावा. असे आदेश गोंदिया उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती,गोंदिया यांना दिले आहे.




