
गडचिरोली,दि.01: अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच या गावी अल्पवयीन मुलीचा नियोजित विवाह महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला.राजपूर पॅच या गावी ३० जूनला रात्री ९ वाजता एका १६ वर्षीय मुलीचा विवाह करण्याचे ठरले होते. वधूपक्षाने विवाहाची तयारी केली होती. पाहुणेही दाखल झाले होते. ही बाब कळताच गडचिरोली येथील जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजपूर पॅच हे गाव गाठले. तेथील ग्रामपंचायत कार्यालयात वधूचे पालक व गावातील नागरिकांना अधिकाऱ्यांनी बालविवाहामुळे होणाऱ्या सामाजिक व शारीरिक दुष्परिणामांबाबत समुपदेशन केले. बालविवाह कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूद असल्याची माहिती दिली. शिवाय बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही, असा जवाब वधूच्या पालकाकडून नोंदवून घेतला. शेवटी त्या अल्पवयीन मुलीचा विवाह रद्द करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक ) कवेश्वर लेनगुरे, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) प्रियंका आसुटकर व क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी ही प्रक्रिया पार पाडली . यावेळी गावातील पोलिस पाटील विलास निकेसर, सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी योगिता गुरनुले, उपसरपंच सुरेश गंगाधरीवार व सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार उपस्थित होते.





