गोंदिया दि.02 (जिमाका) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे.आज 2 जुलै रोजी तब्बल चौदा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला असून एका बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज जे चौदा रुग्ण आढळून आले आहे,त्यामध्ये गोंदिया तालुका – 7 रुग्ण, देवरी तालुका -1 रुग्ण, सडक/अर्जुनी तालुका – 1 रुग्ण, तिरोडा तालुका – 4 रुग्ण, अर्जुनी/मोरगाव तालुका -1 रुग्ण आढळून आले आहे.हे सर्व रुग्ण 20 ते 70 वर्ष वयोगटातील आहे.
29 जून रोजी बाधित आढळलेल्या 72 वर्षीय रुग्णाचा आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे उपचारादरमान्य मृत्यू झाला.मृत्यू झालेला रुग्ण हा सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी येथील रहिवासी होता.या रुग्णाला उच्च रक्तदाब होता.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मागील काही दिवसांपासून सलग आढळून येत असल्याने जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे.आतापर्यंत बाधित रुग्णाची संख्या 145 झाली आहे.तर क्रियाशील रुग्णांची संख्या 41 वर पोहचली आहे.गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 321अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 104 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.
जिल्ह्यात आता 41 क्रियाशील रुग्ण आहे.यातील दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पाठविले आहे.39 रुग्ण गोंदियात उपचार घेत आहे.प्रयोगशाळेत कोरोना संशयित 3487 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये 145 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे,तर 321 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.विविध शाळा व संस्थांमध्ये 416 आणि घरी 1220 अशा एकूण 1636 व्यक्ती विलगीकरणात आहे.
क्रियाशील कंटेंनमेंट झोन जिल्ह्यात बारा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव,पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना व पाथरी,तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड) आणि सडक/अर्जुनी तालुका -राका,सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.