
गोरेगाव दि. 6 ::-तालुक्यातील मोहाडी येथील धान्य दुकानाचे प्राधीकारपत्राची अमानत रक्कम व प्राधीकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रद्द केल्याने ही दुकान तहसीलदार यांनी ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाम्हणी गावाला जोडली आहे . ही धान्य दुकान बाम्हणी ऐवजी मुंढरीटोला गावास जोडा.. अन्यथा ता १२ जुलै पासुन आमरण साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मोहाडी येथील धान्य दुकानदार मदनलाल बघेले यांचे प्राधीकारपत्र रद्द केल्याने तहसीलदार यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ला ठराव मागीतले होते.त्यानुसार ता २३ जुनला सभेत ६ सदस्यांनी मुंढरीटोला येथे जोडण्यात यावे असे सांगितले परंतु ग्रामसेवक यांनी याकडे दुर्लक्ष करून ४ सदस्यांनी शिफारस केलेल्या बाम्हणी गावाला जोडण्यात यावे असे ठराव घेऊन तहसीलदार यांना दिले.त्यामुळे ही धान्य दुकान बाम्हणी गावाला जोडण्यात आली. मोहाडी या गावापासून बाम्हणी गाव ३ किलोमीटर अंतरावर आहे.तसेच येथील रेशन दुकानदार अनेक दिवसांपासून रोगीट असल्याने धान्य वाटप करण्यास असमर्थ आहे. मोहाडी गावापासून मुंढरीटोला हे गाव अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी त्रास कमी करण्यासाठी उपसरपंच प्रभु बघेले, सदस्य चेतना वाकले,कुंतनबाई धपाडे,प्रितीबाई धपाडे, सुनिता धपाडे,साधना नान्हे, सुरेश चौधरी व लाभार्थी जिवनलाल कटरे यांनी तहसीलदार यांना ता २९ जुन ला निवेदन देवून मोहाडी ची धान्य दुकान मुंढरीटोला येथील धान्य दुकानदारास जोडण्याची विनंती केली आहे. तर हेमराज धपाडे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक गोरेगाव यांना पत्र लिहून ही दुकान बाम्हणी ऐवजी मुंढरीटोला गावास जोडण्यात आली नाही तर मोहाडी येथील माता चौक सभामंडपात ता १२ जुलै पासून साखळी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी या पत्रकानुसार कोणती कारवाई करतात याकडे मोहाडी वासीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.




