
मोहाडी,दि.13ः तालुक्यातील कांद्री येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वनरक्षक बी. ई. इंगळे यांना कर्तव्यात कसूर केल्याने उपवनसंरक्षक यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (एक) व ७ च्या उपनियम (२) अन्वये सदर आदेश निर्गमनाच्या तारखेपासून सेवेतून निलंबित केले असून प्रस्तुत आदेश अंमलात असेपयर्ंत इंगळे यांचे मुख्यालय वनपरिक्षेत्र कार्यालय कांद्री देण्यात आले आहे.
इंगळे यांच्या प्रकरणाबाबत शेतकर्यांचे बयान व ईतर चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी जांब कांद्री यांनी उपवनसंरक्षक वनविभाग भंडारा यांना पत्र दिले. त्या पत्रानुसार मोहाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील गिरिधर ईस्तारी मोटघरे यांच्या मालकीच्या शेतातील पळस व ईतर झाडे (जळाऊ) तोडून वाहनातून वाहतूक करीत असताना मुख्य रस्ता मोहाडी मार्गावर मोटघरे यांचा मजूर प्रेमरतन हरिदास येळने यांना व लाकडे असलेले ट्रॅक्टरला वनरक्षक इंगळे यांनी थांबविले आणि कारवाईचा धाक दाखवून ५0 हजार रुपयाची मागणी केली.
यापैकी घटनेच्या दिवशी दि. ४ जून २0२0 ला १0 हजार रुपये स्विकारून पकडलेल्या खाजगी वाहनांवर नियमांप्रमाणे शासकीय कारवाई न करता वाहन सोडून दिले. उपरोक्त गंभीर प्रकरणी नियमाप्रमाणे शासकीय कारवाई करणे अपेक्षित असताना सुध्दा वनरक्षक बी. ई. इंगळे बीटरक्षक बेटाळा यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर करून अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचे प्रथमदर्शनी ते दोषी दिसून येत असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वनरक्षक इंगळे हे तालुक्यात वाळू माफिया, लाकूड व्यवसायिक, आरामशीन मालक, वीटभट्टी ठेकेदारांकडून अवैध वसूली करीत असल्याने निलंबनापूर्वी मोठय़ा प्रमाणात वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.
तसेच शिवसेनेच्या वतीनेही इंगळे यांना निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. इंगळे यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे कांद्री वनपरिक्षेत्र कार्यालयात खळबळ माजली आहे.




