
गोंदिया,दि.30 : भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. त्यावर आधारित उद्योग सुरू झाले पाहिजे व त्या प्रक्रियेला गती मिळाली पाहिजे. दोन्ही जिल्ह्यात विविध उद्योगांचे समूह तयार करण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे एकूण क्षमता ओळखून लहानलहान उद्योगांचे ‘क्लस्टर’ तयार झाले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘भंडारा-गोंदिया जिल्ह्यात व्यवसायाच्या संधी’ या विषयावर त्यांनी तेथील लोकप्रतिनिधींशी ‘व्हिडिओ कॉन्फारन्स’च्या माध्यमातून संवाद साधला. आपल्या जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन, विविध कौशल्याचा उपयोग करून नवीन उद्योग उभे करून लोकांना रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. या भागातील प्रमुख पीक असलेल्या धानापासून काय निर्माण होऊ शकते, याचा विचार होऊन तसे उद्योग सुरू झाले पाहिजे. बाजाराची मागणी लक्षात घेऊनदेखील पीक घेतले पाहिजे या भागात जो कच्चा माल अधिक उपलब्ध आहे, त्या आधारावर नवीन उद्योगांची निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती हे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. या जिल्ह्यांमध्ये पर्यटनासाठी खूप वाव आहे. या स्थळांच्या विकासाचा एक आराखडा तयार करून त्या दृष्टीने नियोजन झाले पाहिजे, असेदेखील गडकरी म्हणाले.





