
मोहाडी,दि.03ः घरटॅक्स पावती का देत नाही म्हणून सरपंच व त्यांच्या पतीला शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना गोबरवाही पोलिस स्टेशनअंतर्गत डोंगरी (बु.) येथे घडली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पाच- सहा दिवस लोटूनही कारवाई थडंबस्त्यातच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डोंगरी (बु.) येथील सरपंच नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असताना नरेश योगराज कुंभरे याने जितेंद्र दौलत सरोदे यांच्या घर कराची पावती परिचर रोशन गौतम यांच्याकडे मागणी केली. जितेंद्र सरोदे यांच्याकडे घरकर थकीत असल्याने पावती देता येणार नाही असे परिचराने सांगितले. तेव्हा नरेश कुंभरे हा मोठय़ाने बोलू लागल्याने सरपंच ममता घडले यांनी त्याला घरकर भरण्याची समज देऊन पावती देण्याची सुचना केल्यानंतर परिचर गौतम यांनी कुंभरे यांना पावती दिली. नंतर दि.२७ जुलैला रात्री ८ वाजेच्या दरम्यान सरपंच ममता घडले यांच्या घरी जितेंद्र सरोते गेला व शिविगाळ करीत तुम्ही घरकराची पावती का देत नाही असे म्हणत भांडण करु लागला. तेव्हा तुम्ही घरी निघुन जा, उद्या ग्रामपंचायतला या, उद्या पाहु असे सरपंच पती राजेश घडले यांनी सांगितले. तेवढय़ात आरोपी दिलिप दौलत सरोते याने सरपंच व तिच्या पतीला लाथाबुक्यानी मारहाण करून शिविगाळ करित पुढे पाहुन घेण्याची धमकी दिली. यानंतर सरपंच ममता घडले यांनी पोलिस स्टेशन गोबरवाही येथे आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केल्याने आरोपी जितेंद्र दौलत सरोते (४0) व दिलिप दौलत सरोते (४३) यांच्या वर भादंवी कलम ३२३, ५0४, ५0६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलांना ५0 टक्के राजकीय आरक्षण मिळाल्याने सरपंच म्हणून गावाचा कारभार चालवित आहेत. मात्र, शिविगाळ, धमकाविने, मारपिट करणे अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे महिला सरपंचामध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे. त्यामुळे असे कृत्य करणार्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी सरपंच सघंटनेने केली आहे.




