38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा

0
312

blank

भंडारा,दि. 11 :- भंडारा शहरात तालुका कृषि अधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृषि विकास अधिकारी पाडवी, तालुका कृषि अधिकारी कोटांगले तसेच विभागाचे अधिकारी, कर्मचारी  व शेतकरी उपस्थित होते.

या महोत्सवात खापरखुटी, कुडव्याच्या शेंगा, पातूर, तरोटा, शेवगा, सात्या, उंदीरकान, अरतफेरी, केना भाजी, फास्याची पाने, आंबाळी भाजी, तांदुळका, शेरेडीरे, पानांचा ओवा, बेल, मोहफुले, चराकली, सुरन, मटारु, कढीपत्ता, घोळभाजी, डाळ भाजी, खारचे पान, रानभेंडी, चिवळ, माट, गवती चहा, तुळस, पांढरा जगन्नाथ, कुरडा/कडु, कोचई/धोपा, भुईआवळा, वास्ते, काटवल, करवंद, कवट, तोंडली, आदी रानभाज्या प्रदर्शनात शेतकऱ्यांनी ठेवल्या होत्या.

                   मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामुळे प्रतिकारशक्ती वाढुन आरोग्य निरोगी राहते. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे.  रानातील म्हणजेच जंगलातील, रानावनातील व शेतशिवरातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यामध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या, फुलभाज्या इ. रानभाज्या या पावसाळयाच्या सुरवातीला मोठया प्रमाणात आढळून येतात. सदर रानभाज्या व फळभाज्यामध्ये औषधी गुणधर्म तसेच  शरिराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. याबाबत सर्व स्तरातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. करटोली, सुरण, गुळवेल, आंबुशी, पाथरी, भुईआवळी, अळू, बांबू, आंबाडा, तांदुळजा, सराटा, आघाडा, कपाळफोडी, करवंद व इतर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही त्यामुळे पुर्णपणे सेंद्रिय असतात.

                   रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हयाच्या ठिकाणी दि. 11 ऑगस्ट 2020 रोजीõ   रानभाजी महोत्सव  साजरा करण्यात आला. 

                  सदर महोत्सवामध्ये जिल्हयातील उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पध्दती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची माहिती देण्यात आली. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

blank