नवी दिल्ली,दि.15 : देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी योजना सुरु केली आहे. आज 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालकिल्ल्यावरून मोदींनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली. या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ कार्ड बनविले जाणार असून त्याद्वारे त्याच्यावर डॉक्टरांनी काय उपचार केले, कोणती औषधे दिली, त्याला असलेले आजार, डॉक्टरांनी केलेले निदान आदी माहिती ठेवली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीयांसाठी ही योजना फायद्याची असणार असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. याचबरोबर देशाला सायबर हल्ल्यापासून वाचविण्यासाठी नवीन सायबर नीती आणणार असल्याचे मोदी म्हणाले. डिजिटल भारताने मोठी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात भीम अॅपद्वारे 3 लाख कोटींचे व्य़वहार झाले आहेत. 2014 मध्ये केवळ 5 डझन ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या होत्या. आता हा आकडा दीड लाखांवर गेला आहे. पुढील 1000 दिवसांत प्रत्येक सहा लाख गावांना याच्याशी जोडण्यात येणार आहे, असे मोदी म्हणाले. कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडलाय. तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन तयार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आपल्याला माहितच आहे की, एक काळ असा होता की विस्तारवादाची विचारसरणी असणारे जेथे शक्य असेल तेथे पसरण्याचा प्रयत्न केला, आपले झेंडे फडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताची स्वातंत्र्य चळवळ जगात प्रेरणेचे स्त्रोत बनली आणि जगात स्वातंत्र्याची ज्योत पेटली.
जे विस्तारवादाच्या आंधळ्या शर्यतीत गुंतलेले होते त्यांनी विस्तारवादाच्या योजना पूर्ण करण्यासाठी जगाला दोन महायुद्धात ढकलले. जगाला उद्ध्वस्त केले. भारत विस्तारवादासाठी आव्हान बनला. आता कोरोना काळात 130 कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला आहे. आपण हे करूच.
15 ऑगस्ट हा शूर वीर, स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा सण
पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या सुरुवातील सर्व देशबांधवांनी स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे माता भारतीच्या लाखो मुले व मुलींचे त्याग-बलिदान आणि समर्पण आहे. आज स्वातंत्र्यवीर, रणबांकुर यांना अभिवादन करण्याचा सण आहे. आपले सैन्य-निमलष्करी दले, पोलिस कर्मचारी, सुरक्षा दलांशी संबंधित प्रत्येकजण, भारतींच्या संरक्षणामध्ये व्यस्त आहेत. आज त्यांच्या सेवेलाही नमन करण्याचा दिवस आहे. आज अरविंद घोष यांची जयंती आहे. क्रांतिकारकापासून ते अध्यात्मिक ऋषी बनले. आज त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. मी कोरोनाच्या संकटात कोरोना वॉरियर्सला नमन करतो.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- पंतप्रधान मोदी म्हणाले – स्वातंत्र्याच्या ध्येयवादी नायकांना आठवून नवीन उर्जेचा हा संकल्प आहे. एक प्रकारे हे आपल्यासाठी नवीन प्रेरणा घेऊन येते. आम्हाला नवीन संकल्प घेणे देखील महत्वाचे आहे. पुढील वर्षी आपण 75 व्या वर्षी प्रवेश करू. ही स्वत: मध्ये एक मोठी संधी आहे. यासाठी आजे येणाऱ्या पुढील दोन वर्षांसाठी मोठे संकल्प घेऊन आपल्याला चालायचे आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रवेश करु आणि 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी हा महापर्व म्हणून साजरा करू.’
- वयाच्या 20-21 व्या वर्षी आपले कुटुंबीय आत्मनिर्भर व्हायला सांगतात, देश 75 व्या वर्षाच्या दिशेने जात असताना आत्मनिर्भर होणे आवश्यकच आहे.
- कच्चा माल पाठवायचा आणि तयार वस्तू आयात करायची, हे किती वर्ष करत राहणार? किती दिवस कच्चा माल पाठवून पक्का माल आयात करायचा. आपल्याला कच्चा मालात मुल्यवृद्धी करुन भारताला आत्मनिर्भर करावं लागेल.
- देशाच्या तरुणांमधील महिलांमधील क्षमतेवर विश्वास आहे. भारताने एकदा ठरवले की भारत ते करुनच दाखवतो. त्यामुळेच आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा जगाला भारताकडून अपेक्षा देखील आहेत. आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी तयारी करायला हवी. युवकांनी भरलेला भारताला आत्मविश्वास कमवावा लागेल. आपल्याला भारतात तयार झालेल्या सामानाची जगभरात वाहवा करायची आहे. एककाळ होता जेव्हा भारताचे असे कौतुक होत होते.
- वेदात वसुधैव कुटुंबकम म्हणत होते तर विनोबा जय जगत म्हणायचे. हे विश्वच भारतासाठी नेहमी घर राहिले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढावे त्यासाठी भारताला स्वतःला सशक्त आणि आत्मनिर्भर व्हावे लागेल. आपली मुळं मजबूत होतील तेव्हा आपण जगाला देखील मदत करायला पुढे येऊ. आपल्या देशात नैसर्गिक साधनांची कमतरता नाही. त्यामुळे आपल्याला या संसाधनांमध्ये मुल्यवृद्धी करावी लागेल.
- एक काळ होता जेव्हा भारताला बाहेरुन गहु आयात करावा लागत होता. मात्र, आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. आज भारत जगाला अन्नधान्य पुरवू शकतो. भारताला जगाच्या अपेक्षांवर उभे राहण्यासाठी कृषी क्षेत्राला चालना द्यावी लागेल. आम्ही कृषी क्षेत्राला कायद्यांच्या कचाट्यातून बाहेर काढले. अवकाश क्षेत्राला मुक्त केले, त्यात तरुणांना नव्या संधी मिळत आहेत.
- कोरोनाच्या संकटकाळात अनेक गोष्टींसाठी आपल्याला आयात करण्याची वेळ आली मात्र, ते जग देऊ शकले नाही. त्यावेळी देशात एन-95, व्हेटिलेटर आणि अनेक गोष्टी तयार व्हायला लागल्या. आज भारत जगात निर्यातही करु शकतो.
- फक्त आयातीवर बंदी घालणे आपला उद्देश नाही. निर्यातक्षमही व्हायचे आहे. भारतात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवे.
- लाखो गरिबांच्या खात्यात कोट्यावधी रुपये हस्तांतरित होतील, शेतकरी, व्यापार, अंतराळ क्षेत्र यात आमुलाग्र बदल होतील, असे कुणालाच वाटले नव्हते. पण ते झाले. भारतातील बदलाच्या या काळाला जग बारकाईने पाहतेय. त्यामुळेच परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. मागीलवर्षी एफडीआयमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळातही जगभरातील कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. हे असंच झालेले नाही. यासाठी भारताने अनेक आमुलाग्र बदल केले आहेत.
- नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पाची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी 110 लाख कोटी पेक्षा अधिक खर्च केला जाईल. यासाठी विविध क्षेत्रात जवळपास 7 हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. या संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवरकाम केल्याने सर्वच घटकांना फायदा होणार आहे.
- कोरोनाच्या संकटातही कोट्यावधी गरिबांना मोफत गॅस मिळाला. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पोहचवण्यात आलं. 90 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये गरिबांच्या खात्यात पोहचले. कुणाला विश्वासही नव्हता की दिल्लीतील 100 रुपयांपैकी 100 रुपये गावांपर्यंत पोहचतील.
- गावातील संसाधनांवर विश्वास ठेऊन व्होकल फॉर लोकलवर भर द्यायचा आहे. गावातील लोक दूरदूर कामासाठी बाहेर जातात. मात्र त्यांना आता गावाकडे परतावं लागलं आहे. गावाकडून शहरात कामासाठी येणाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी आम्ही एक मोठी योजना बनवली आहे. त्यामुळे गावाकडून कामाला येणाऱ्यांना सुविधा मिळेल.
- देशात कोणतीही वस्तू कोठेही तयार झाली तर देशातील कुठेही जाऊन विकता येत होती, मात्र भारताच्या शेतकऱ्याला आपला माल इतर ठिकाणी जाऊन विकता येत नव्हता. त्यासाठी आम्ही अनेक कायदे रद्द केले आणि त्यांना मुक्तता दिली. आता भारताचा शेतकरी देखील देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन त्यांच्या शर्तींवर आपला शेतीमाल विकू शकतो.
- आज ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्नादन संघ तयार करण्याची योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवी ताकद मिळेल. मागीलवर्षी जल मिशन योजनेची घोषणा केली. त्यातून देशाच्या प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळायला हवं. त्यासाठी मागील काळात आपण मोठं काम केलं. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक भागात प्रयत्न सुरु आहेत.
- मध्यमवर्गातून निघालेले डॉक्टर, इंजिनिअर, वकील, वैज्ञानिक जगभरात आपला डंका वाजवत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपांपासून मुक्ती हवी आहे. त्यासाठी आमचं सरकार सातत्याने काम करत आहे. स्वस्त इंटरनेट, स्वस्त स्मार्टफोन, परवडणारा हवाई प्रवास अशा अनेक गोष्टींमधून आपण मध्यमवर्गासाठी प्रयत्न करत आहोत.
- 25 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करुन मध्यमवर्गांना घरं मिळावी म्हणून काम केलं जात आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल.
- देशाच्या विकासात शिक्षणाचं खूप महत्व आहे. त्यामुळेच तीन दशकांनंतर आम्ही देशाला एक नवं शिक्षण धोरण दिलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगात मानाने काम करता येईल. देशात प्रगती होण्यासाठी संशोधनाला फार महत्त्व असतं.
- मागील 5 वर्षात दीड लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहचलं आहे. उरलेल्या 1 लाख ग्रामपंचायतींनाही लवकरात लवकर ही व्यवस्था दिली जाईल. सर्व 6 लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सुविधा पोहचवली जाईल. हजारो किलोमीटरपर्यंत हे काम होईल. 1000 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करु.
- सायबरच्या क्षेत्रात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे देशाच्या विकासावर, सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या धोक्यांचा विचार करुन भारत सतर्कतेने नव्या व्यवस्था विकसित करत आहे. नवी सायबर सुरक्षा धोरण तयार केलं जात आहे. येणाऱ्या काळात या सायबर सुरक्षेत सर्वजण सोबत पुढे जाऊ.
- भारतात महिला शक्तीला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी देशाचं नावं रोषण केलं. आज महिला कोळशाच्या खाणीत काम करत आहेत तशाच अवकाशातही काम करत आहेत. गर्भवती महिलांना पगारी 6 महिन्यांची सुट्टी देणं असो, मुस्लीम महिलांना मुक्ती देणं, 40 कोटी जनधन खात्यांमध्ये 22 कोटी खाते महिलांचे. त्यात 30 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनते देखील अधिकाधिक महिलांच्या नावे घर होत आहे.
- मुलींच्या लग्नाचं वय किती असावं याबाबत विशेष समिती तयार करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांच्या वयाबाबतही निर्णय घेतला जाईल.
- राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन आजपासून, प्रत्येकाला ओळखपत्र मिळणार, तुमचे आजार, औषधे, डॉक्टरांनी केलेलं निदान याची माहिती एकाच कार्डवर
- कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जाईल. लस तयार झाल्यावर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार तयार आहे.
- आपल्या देशात कोरोनाच्या आधी केवळ एक प्रयोगशाळा होती. आता 1400 पेक्षा अधिक प्रयोगशाळा आहेत. 300 पासून 7 लाख कोरोना चाचणीपर्यंतचा टप्पा भारताने गाढला आहे. 5 वर्षात 35 हजार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी तयार झाल्या.
- देशाच्या आरोग्य क्षेत्रात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात आहे. ही भारतात मोठी क्रांती करेल. उपचारात खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी भारतातील प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यात त्या नागरिकाच्या आरोग्याची सर्व माहिती त्या कार्डात असेल. या मिशनमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्यांना उपचार घेणं सोप होणार आहे.
- जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी विकासाच्या नव्या युगाला पुढे नेत आहेत. मी त्या सर्व सरपंचांचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या निदर्शनाखाली जम्मू काश्मीरला पुन्हा सामान्य स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगची विशेष काळजी घेण्यात आली आहे. दोन जागांमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे.





