
गोंदिया दि.30 – जिल्ह्यात 28 आणि 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने गोंदिया तालुक्यातील 20 आणि तिरोडा तालुक्यातील 10 गावातील 1282 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
पुराचे पाणी आता ओसरू लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. 28 ऑगस्ट 77:16 मिलीमीटर आणि 29 ऑगस्ट रोजी 76:49 मिलिमीटर असा सरासरी पाऊस झाल्याने दोन्ही दिवस अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग याच काळात करण्यात आल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट झाली होती.

पूरपरिस्थितीच्या या काळात मदत व बचाव कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे व पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात महसूल आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली.सुरक्षेच्या कारणास्तव गोंदिया तालुक्यातील बनाथर येथील एकोणविस, कटंगटोला येथील दोन, वडेगाव,तेढवा,डांगुर्ली,किन्ही,मरारटोला,पुजारीटोला येथील सत्त्यांशी, कासा,बिर्सोला येथील तीस,आंबाटोला येथील तीस,जिरूटोला येथील दोन, भद्याटोला येथील दोन,महालगाव व मुरदाडा येथील एकशे सहासष्ट,मुर्दाळा येथील 48,सायटोला येथील बत्तीस, धापेवाडा,लोढीटोला व देवरी येथील पंचवीस नागरिकांना तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील 96 नागरिकांना हलविण्यात आले.
जिल्ह्यात सद्यस्थितीत गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला,कासा, ब्राह्मणटोला,महालगाव,मुरदाडा, धापेवाडा आणि लोधीटोला तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, चांदोली, घाटकुरोडा, बिरोली आणि सावरा गावांचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे.ज्या गावातील लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे त्या नागरिकांची संख्या 136 आहे.गोंदिया तालुक्यातील जिरुटोला येथील आठ, भदयाटोला येथील दोन,मरारटोला येथील 32 आणि तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील 96 लोकांचा समावेश आहे.

काही नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता निवारा समाज मंदिर/अंगणवाडी/ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व खाजगी शाळेच्या इमारतीमध्ये तसेच त्यांच्या मित्रांकडे व नातेवाईकांकडे हलविण्यात आले आहे. त्यामध्ये बनाथर येथील शाळेत/ समाज मंदिरात 19 लोक,कटंगटोला येथे समाज मंदिरात दोन लोक, ब्राह्मणटोला येथील प्राथमिक शाळेत 43 लोक,बिर्सोला येथील अग्रवाल शाळेत 30 लोक,आंबाटोला ग्रामपंचायत येथे 30 लोक जीरुटोला व भदयाटोला येथील समाज मंदिरात प्रत्येकी दोन लोक,मुरदाडा येथील जिल्हा परिषद शाळेत 214 लोक, साईटोला येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीत 32 लोक,देवरी येथील ग्रामपंचायत आणि अंगणवाडी 25 लोक आणि 44 लोक हे त्यांच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे थांबलेले आहेत. गोंदिया तालुक्यातील या 443 लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने या निवारास्थळी हलविण्यात आले आहे.
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोनशे लोक,करटी/खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत चारशे लोकांना, ग्रामपंचायत घोगरा येथे 36 लोक आणि 203 लोकांची व्यवस्था त्यांचे नातेवाईक व मित्रांकडे करण्यात आलेली आहे. दोन्ही तालुक्यातील 443 आणि 839 अशा एकूण 1282 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.गोंदिया तालुक्यातील 241 घरांचे अंशता नुकसान झाले आहे. 85 गोठयांचे अंशतः आणि दोन गोठ्यांचे पूर्णता नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यातील 252 घरांचे अंशता आणि बारा घरांचे पूर्णता नुकसान झाले असून 45 गोठयाचे अंशतः आणि पाच गोठया पूर्णतः नुकसान झाले आहे.
पूरपरिस्थिती या काळात मदत व बचावासाठी सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व नायब तहसीलदार, सर्व पोलीस निरीक्षक तसेच महसूल आणि पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे.





