
भंडारा,दि.08: महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन “चला माणुसकी जपुया,पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊया” आणि “#StandWithEasternVidarbha” ह्या दोन मोहीम ट्विटर, व्हाट्सअप्प आणि फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून हाती घेऊन पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत निधी उभा केला आहे.
या मोहिमेअंतर्गत ऑनलाइन पध्दतीने आर्थिक रक्कम गोळा केली आणि कोरोनाच्या संकटकाळात घराबाहेर पडून या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना ०६ सप्टेंबर रोज रविवारला भंडारा/ गोंदिया जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील करचखेडा, बेरोडी, सालेबर्डी लाखांदूर तालुक्यातील मोहूर्णा, इटान आणि गोंदिया जिल्ह्यातील बिरसोला या गावात मदत केली.वैनगंगा नदीला अचानक पाणीसाठा वाढल्याने मोठ्या प्रमाणात घर, पीक, घरी साठवलेले वर्षभराचे अन्न, कपडे व इतर वस्तू वाहून गेल्याने वस्तूंची नासाडी झाली. म्हणून शेतकरी पुत्र या नात्याची बांधिलकी जपत मदतीचा हात म्हणून अगोदर या गावामध्ये विद्यार्थ्यानी वस्तूंचे पाकिट तयार करून वाटप केले.आणि पूरग्रस्तांच्या या कठीण प्रसंगात मायेची फुंकर घातली. सदर विद्यार्थी राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठात शिक्षण पूर्ण करून देशातील तसेच राज्यातील विविध पदांवर कार्यरत आहेत.या सर्वांनी सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून जमेल त्या स्वरूपात पूरग्रस्तांना सरळ हाताने मदत केली आणि राज्यातील जनतेला देखील मदतीचे आव्हान केले