
भद्रावती =पोलीसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत देशी दारूसाठय़ासह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई चार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई काल शुक्रवारला करण्यात आली. अर्जुनसिंग प्रेमसिंग जुनी (२४ वर्ष), रा. वडनेर, अजित पांडुरंग सुरसे (३५ वर्ष) रा. राजुरा कॉलरी वणी, गजानन शंकर गोहने (४२ वर्ष), रा. श्रीरामनगर भद्रावती, सुंदर रूपचंद वर्मा (४१ वर्ष), रा. नवीन सुमठाना अशी आरोपींची नावे आहेत.
अटकेतील आरोपी पूर्णा सेल्स अँण्ड सर्विस तेलवासा रोड येथे दारू साठा जमा करून विक्री करत होते. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी धाड टाकून चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. तर दुसर्या कारवाईत नागपूर चंद्रपूर महामार्गावर गाडी (क्रमांक एम.एच.८0 सी ८७0३) नागपूरमार्गे चंद्रपूरकडे दारू साठा भरून येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली, त्याआधारे टप्पा परिसरात नाकाबंदी केली, असता ते वाहन मागे वळून एम्टा खाणीच्या कच्च्या रस्त्याने जात असताना त्या वाहनाचा टायर फुटल्याने चालक जागेवरून पसार झाला. या दोन्ही कारवाईतील दारूसाठा व वाहन असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार, गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चीटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.