वाघाच्या हत्येच्या कारणमिमांसेसाठी वनविभागाची कसरत

‘पिटर’ने पिंजून काढला परिसर

0
265

गोंदिया : शहराला लागून पाच किलोमिटर अंतरावर वाघाचा मृतदेह सोमवारी आढळून आला. त्या वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग आणि वन्यजीव विभागाला घाम फुटले. सर्व बाजूने मृत्यू, की शिकार याचे कारण शोधण्यात येत असून वनविभागात असलेला पिटर नावाचा श्वान सोमवार आणि मंगळवारी शिवार पिंजून काढत आहे.

नागझिरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पांगडीनजीकच्या लोधीटोला येथे पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह रविवारी नागरिकांना दिसला. त्यांनी त्याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली. पोलिस आणि वनविभागाने पोहोचून पंचनामा केला. दरम्यान त्या वाघाच्या तीन पायांचे पंजे, जबडा आणि इतर अवयव बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्या वाघाचा दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला. वाघाला पांगडी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत पुरण्यात आले. आता त्या वाघाचा शिकार झाला की, नैसर्गीक मृत्यू याचे कारण शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. त्याकरिता वनविभागाच्या पिटर या श्वानाची मदत घेतली जात आहे. दोन दिवसांपासून पिटर संपूर्ण शिवार पिंजून काढत आहे. आज सायंकाळपर्यंत जास्त माहिती वनविभागाला मिळाली नाही. माहिती घेण्याकरिता सर्व बाजूने तपास करण्यात येत असल्याची माहिती उप वनसंरक्षक कुलराजसिंह यांनी दिली.