अवैध दारू अड्ड्यांवर धाड घालून 1.75 लाखांचा माल जप्त

0
62

तिरोडा : दवनीवाडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अनेक ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर छापे घालून तब्बल 1 लाख 74 हजार 980 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई 21 व 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

या कारवाईत मुरदाडा येथे अवैध दारूच्या एका अड्ड्यावर धाड घालून 2660 रूपयांचा मुद्देमाल, महालगाव येथे दोन ठिकाणी धाड घालून 2320 रूपयांचा व पिपरिया येथे एका ठिकाणी धाड घालून 2 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच बोंडराणी येथील वैनगंगा नदी पात्रात 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचा 2400 किलो सडवा मोहापास बेवारस स्थितीत आढळला.

दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मुरदाडा येथे काही लोक अवैध दारू बाळगून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने 21 फेब्रुवारीच्या सायंकाळी 4.30 वाजता सहायक पोलीस निरीक्षक उरकुडे यांनी आपल्या ताफ्यासह अवैध दारू अड्ड्यांवर छापे घातले. तसेच महालगाव येथे सायंकाळी 6 ते 6.45 वाजताच्या अवैध दारू अड्ड्यांवर छापे घालण्यात आले. तर पिपरिया येथील अवैध दारू अड्ड्यांवर 22 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7.10 वाजताच्या सुमारास छापे घालण्यात आले.

यांच्यावर झाली कारवाई

  • या कारवाईत सुनील मधुजी मस्करे (वय 40) व दिनेश मधुजी मस्करे (वय 34) दोन्ही रा. मुरदाडा याच्याकडे अवैधरीत्या 1200 रुपये किंमतीचे प्रत्येकी 180 एमएलने भरलेले 20 देशी दारूचे पव्वे, 560 रुपये किंमतीचे 180 एमएलने भरलेले ओसी ब्लु विदेशी दारूचे 4 पव्वे तसेच 900 रुपये किंमतीचे प्रत्येकी 180 एमएलने भरलेले मॅकडॉल नं.1 चे 6 पव्वे आढळले.
  • महेंद्र रामलाल तिवडे (वय 39) रा. महालगाव याच्याकडे विना पासपरवाना अवैधरित्या 720 रुपये किंमतीचे प्रत्येकी 180 एमएलने भरलेले देशी दारूचे 12 पव्वे आढळले.
  • विनोद पुरुषोत्तम नागपुरे (वय 21) व मनोज पुरुषोत्तम नागपुरे (वय 19) दोन्ही रा. महालगाव यांच्याकडे विना पासपरवाना 600 रुपये किंमतीचे प्रत्येकी 180 एमएलने भरलेले 10 देशी दारूचे पव्वे, 1 हजार रुपये किंमतीची एका प्लास्टीक दबकीत 10 लिटर मोहफुलांची दारू आढळली.
  • रामकिशोर जयराम शेंडे (वय 45) रा. पिपरिय याच्याकडे दोन प्लास्टीक डबकीत 2 हजार रुपये किंमतीची 20 लिटर मोहफुलांची दारू आढळली.
  • तसेच 22 फेब्रुवारी रोजी बोंडराणी शिवारातील वैनगंगा नदी पात्रात 1 लाख 68 हजार रुपये किंमतीचा 2400 किलो सडवा मोहापास बेवारस स्थितीत आढळला.

सदर कारवाईत असा एकूण 1 लाख 74 हजार 980 रूपयांचा माल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश उरकुडे, पोलीस हवालदार देवराम खंडाते, धर्मपाल भुरे, राजेश पारधी, पोलीस शिपाई मोहन टेंभेकर, बुधराम डोहरे व चालक पोलीस शिपाई मेंढे यांनी केली.