गडचिरोली-जवळच असलेल्या बोदली जंगल परिसरातून वनविभागाच्या पथकाने भरमार बंदुक, स्फोटकासह पाच शिकार्यांना २४ मार्च रोजी अटक केली. गुल्लूसिंग शेरसिंग दुधानी, नानुसिंग गुमानसिंग पटवा दोघेही रा. गोकुळनगर गडचिरोली, बालाजी मुकुंदा दळांजे रा. विहीरगाव, पिंकूश सुरेश खोब्रागडे, रा. चांदाळा, विनोद किसन नरोटे रा. चांदाळा टोला अशी अटक करण्यात आलेल्या नावे आहेत.
गडचिरोली वनपरिक्षेत्रात वाघाचे वावर असल्यामुळे २४ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजतापासून क्षेत्रसहायक गडचिरोली व त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी जंगल परिसरात गस्त करीत असताना दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास नियतक्षेत्र बोदली येथील कक्ष क्रमांक १७६ मध्ये ५ संशयित इसम दिसून आले. सदर इसमांची क्षेत्रसहायक यांनी तपासणी केली असता त्यांचेकडे भरमार बंदूक व स्फोटक पदार्थ आढळून आले. घटनेबाबत वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देण्यात आली. सहायक वनसंरक्षक (रोहयो) सोनल भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. कैलुके, यांनी घटनास्थळावर जाऊन सदर इसमांची चौकशी केली असता आरोपींनी जंगलात जाऊन वन्यप्राण्याची भरमार बंदूक व बॉम्ब गोळय़ाचा वावर करून शिकार करीत असल्याचे सांगून कक्ष क्रमांक १७६ मध्ये ५ ठिकाणी बॉम्ब गोळे पेरून ठेवल्याचे आरोपींनी प्रत्यक्ष वनाधिकार्यांना दाखविले. त्यामुळे सदर आरोपींना अटक करून त्यांच्यावरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना गडचिरोली न्यायालयातील हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या पथकाने केली. पुढील तपास क्षेत्रसहायक डी.व्ही. कैलुके, प्रमोद जेणेकर, वनरक्षक भसारकर करीत आहेत.
|