37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता 13 मोटारसायकलसह 3 आरोपी ताब्यात, गाड्या चोरणार्‍या रॅकेटचा पर्दाफास

13 मोटारसायकलसह 3 आरोपी ताब्यात, गाड्या चोरणार्‍या रॅकेटचा पर्दाफास

0
64

blank

गोंदिया, दि.30 : वेगवेगळ्या ठिकाणातून चोरी झालेल्या 13 मोटारसायकल तिरोडा व गोरेगाव हद्दीतून जप्त करून डुग्गीपार पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. रोहित सावलदास पुंडे (वय 19), बंटी उर्फ उमेश दुर्गाप्रसाद बोपचे (वय 24) दोन्ही रा. सोनी, ता. गोरेगाव व गोलू उर्फ दिलीप देवचंद पटले (वय (26) रा. मानेगाव, ता. आमगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी तौशिक कलीम शेख (वय 32) रा. सडक अर्जुनी यांनी आपली मोटारसायकल अॅक्टिवा डीएलएक्स (एमएच 35/डीजी-5564) दुरुस्तीसाठी विनोद भांडारकर रा. कोसबी यांच्या न्यू केजीएन मोटार सायकल रीपेरिंग दुकानसमोर दुरुस्तीसाठी आणून ठेवली होती. अज्ञात चोरांनी ती मोटारसायकल रात्रीला संधी साधून पळविली. ही चोरी 27 ते 28 मेच्या रात्रीदरम्यान घडली. तौशिक शेख यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे करीत होते.सदर गुन्ह्यात चोरी गेलेली मोटारसायकलचा तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आपल्या स्टाफसह डुग्गीपार व गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या क्षेत्रात करीत होते. दरम्यान गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, एक दिवसापूर्वी सुदर्शन केवलराम बिसेन रा. हिरापूर ता. गोरेगाव यांच्याकडे ग्रे रंगाची अॅक्टिवा मोपेड गाडी आणली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी हिरपूर येथील सुदर्शन बिसेन यांचे घर गाठले. त्यांच्या घरासमोरील छपरीत ग्रे रंगाची व एमएह 31/डीजी-5564 क्रमांकाची अॅक्टिवा गाडी आढळली. त्यावेळी सुदर्शन बिसेन व देवलाबाई केवलराम बिसेन (वय 45) घरीच होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता सदर गाडी सडक-अर्जुनी येथील केजीएन मोटारसायकल दुरूस्तीच्या दुकानासमोरून चोरी करून आणल्याचे सांगितले.

सदर दोन्ही आरोपी व गोलू उर्फ दिलीप देवचंद पटले रा. मानेगाव ता. आमगाव असे चौघे मिळून यापूर्वी सुद्धा काही मोटारसायकल चोरी केलेल्या आहेत.या माहितीवरून पोलीस निरीक्षक वांगडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासचक्रे फिरविली. त्याला सोबत घेऊन रोहित पुंडे, बंटी उर्फ उमेश बोपचे व गोलू उर्फ दिलीप पटले यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांचा मोटारसायकल चोरीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणातून चोरी करून आणलेल्या एकूण 13 मोटारसायकल गोरेगाव व तिरोडा हद्दीतून विविध ठिकाणातून जप्त केल्या.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय अधिकारी (देवरी) जालंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन वांगडे व त्यांचा स्टाफ पोलीस हवालदार हरिश्चंद्र शेंडे, जगदेश्वर बिसेन, पोलीस नायक सुरेश चंद्रिकापुरे, पोलीस शिपाई सुनील डहाके, घनश्याम मुळे यांनी केली.

 

blank