नायब तहसिलदार व तलाठी यांना 75 हजार रुपयांची लाच घेताना अटक

0
119

 

कोल्हापूर :– वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी अजरा तहसिल कार्यालयातील उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसिलदार (महसूल) व तलाठी यांना 75 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने सापळा रचून केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (सोमवार) सकाळी करण्यात आली.अजरा तहसिल कार्यालयातील उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसिलदार (महसूल) संजय श्रीपती इळके  (वय-52) आणि तलाठी राहूल पंडीतराव बंडगर  (वय-33) असे लाच  घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज शामराव पोवार यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज पोवार यांनी वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी तहसिल
कार्यालयाकडे प्रस्ताव ठेवला होता. याकामासाठी इळके व बंडगर यांनी 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत पोवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सोमवारी सकाळी सापळा रचून इळके आणि बंडगर यांना पैसे स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार
संजीव बंबरगेकर, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, पोलीस
कॉन्स्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने केली.