
भंडारा- लाखनी तालुक्यातील बेपत्ता झालेल्या दोन मुलींना सायबर सेल आणि लाखनी पोलिसांनी मोठय़ा शिताफीने जळगाव जिल्ह्यातून परत आणून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. या मुलींचे लग्न लावले जात असतानाच पोलिस तिथे पोहोचल्याने या दोन्ही मुली आपआपल्या घरी सुखरुप पोहोचल्या आहेत.
धाबेटेकडी आणि मोगरा/शिवनी येथील दोन तरुण मुली ५ जुलै रोजी लाखनी येथे कॉलेजला जातो म्हणून निघाल्या. परंतु, त्या घरी परतल्या नाही. दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी लाखनी पोलिस स्टेशनला केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिस अधीक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात लाखनीचे ठाणेदार वाढीवे यांनी टीम तयार केली.
सायबर पोलिस स्टेशन येथून तांत्रीक माहितीच्या आधारे या मुली जळगाव जिल्ह्यातील ग्राम कोलन्हवी येथे असल्याचे समजताच मध्यरात्री पथक रवाना करण्यात आले. पोलिस पथकातील महिला पोलिस अंमलदार वासंती बोरकर या अपर पोलिस अधीक्षकांच्या वेळोवेळी संपर्क राहून माहिती प्राप्त केली. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती हे यापूर्वी जळगाव येथे कार्यरत असल्याने त्यांना सदर परिसरातील गुप्त बातमीदाराच्या मदतीने वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते.
पोलिस पथक पहाटे त्या गावात प्रवेश करताच मुलींना आणि तेथील इसमांना पोलिस आले असल्याची चाहुल लागली व त्यांनी गावाचे मागील भागातून पळ काढला. बेपत्ता मुलींना त्यांच्या फेसबुकवरील मित्रांनी गावालगत असलेल्या एका मंदिरात लग्न लावण्यास घेवून गेले असल्याची माहिती प्राप्त झाल्याने लगेच गावातील लोक आणि पोलिस पथक तात्काळ त्या ठिकाणातील मंदिरात पोहचून तरुण व बेपत्ता दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुलींना त्यांच्या आई, वडिलांकडे सुपूर्द करण्यासाठी पथक रवाना झाले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन लाखनीचे ठाणे प्रभारी वाढीवे, पोलिस उपनिरीक्षक वनवे, महिला पोलिस अंमलदार वासंती बोरकर, पोलिस शिपाई देवकते तसेच सायबर पोलिस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार, गौतम राऊत, स्नेहल गजभिये, राजेंद्र कापगते, निखील रोडगे यांनी केली.