दगडफेक करून आणखी दोन एसटीच्या काच्या फोडल्या

0
264

गोंदिया : मागील दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनात विलीन करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेवून कर्मचार्‍यांचे संप सुरू आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या काही संघटनांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेवून राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे कर्मचारी कामावर परत येवू लागले. मात्र, गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारातील ९० टक्के कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर दुसरीकडे गोंदिया, भंडारा, तिरोडा, साकोली या आगाराकडून काही प्रमाणात एसटी बसफेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. आज (ता.१२) भंडारा आगाराच्या दोन एसटी बसवर गोंदिया – कोहमारा मार्गावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. त्यामुळे ते समाजकंटक कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस आरोपींना शोधून काढणार काय? याकडेही लक्ष लागले आहे.
मागील ७२ दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे संप सुरू आहे. दरम्यान राज्य सरकारच्या विनंतीवर राज्य कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही कर्मचारी कामावर रूजू होवू लागले आहेत. गोंदिया आगारातील संपकरी पाच चालक कामावर परतले. त्याचप्रमाणे तिरोडासह साकोली, भंडारा, तुमसर या आगाराचे काही कर्मचारी कामावर परतले आहेत. यामुळे कालपासून भंडारा विभागातील सर्व आगाराकडून वाहक व चालकांच्या हजेरीला अनुसरून बससेवा सुरू करण्यात आली. गोंदिया आगारातून ५ एसटी बसफेर्‍या सुरू करण्यात आल्या आहेत. यातील तीन बसफेर्‍या साकोली मार्गे तर दोन बसफेर्‍या तिरोडा मार्गाने धावत आहेत. त्याचप्रमाणे भंडारा आगारातील तीन बसफेर्‍या गोंदियाकरीता सोडण्यात आल्या आहेत. आज (ता.१२) भंडारा आगारातील एक एसटी बस भंडाराकडे जात असताना गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार गावशिवारात काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. दरम्यान एसटीचे समोरचे काच फुटल्याने नुकसान झाले. तर दुपारी २.३० वाजता सुमारास भंडाराकडून गोंदियाकडे येणार्‍या बसवर मुंडीपार ते मुरदोली या दोन्ही गावाच्या मध्यठिकाणी दगडफेक करण्यात आली. या एसटी बसचेही काच फुटल्याने नुकसान झाले. उल्लेखनिय असे की, दोन्ही घटना एकाच मार्गावर अवघ्या ५ ते ६ किमी अंतरावरच्या आहेत. तसेच दोन्ही घटनांचा वेळ अर्धा ते एक तास दरम्यानचा आहे. त्यामुळे काही ठराविक आरोपींची दोन्ही घटनामधील करामत असल्याची बाब प्रथमचरणी समोर आली आहे. या घटनांची नोंद बातमी लिहेपर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती.