
गोंदिया,दि.13ः-गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतंर्गत येत असलेल्या जयस्तंभ चौकातील गौरीशंकर पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या वाहनचालकाची बजाज डिस्कवर मोटारसायकल(एमएच 35 व्ही 4361) आँनलाईन पेमेंट करुन कँबीनमधून बाहेर येईपर्यंत चोरट्यांनी पेट्रोलपंप कार्यालयाच्या समोरूनच लंपास केल्याची घटना 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.सदर मोटारसायकल चालक फिर्यादी दिनेश माधोराव मदारकर(वय 47)रा.कारंजा यांनी वाहनाचा शोध काही दिवस घेतल्यानंतर 12 जानेवारीला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.विशेष म्हणजे ज्या पेट्रोलपंपावरुन ही दुचाकी चोरीला गेली,त्याठिकाणी वाहतुक पोलीस दररोज असतात तसेच या चौकात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरेसुध्दा लावलेले आहेत.परंतु ज्या पंपावरुन ही मोटारसायकल चोरीला गेली,त्यापंपावर सीसीटीव्ही नसल्याचे फिर्यादी मदारकर यांनी सांगितले.पेट्रोल भरल्यानंतर आँनलाईन 200 रुपयाचे पेमेंट करण्यासाठी मदारकर हे कॅबीनमध्ये गेले व पेमेंट करुन अवघ्या काही मिनिटात परत येत नाही तोच कँबीनच्या बाजूला ठेवलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केलेली होती.त्यानंतर शोधाशोध व विचारपूर केल्यानंतरही दुचाकी न मिळाल्याने तक्रार नोंदवण्यात आली असून मुख्य चौकात असलेल्या या पंपावर सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत असल्या तरी चौकात पोलीस विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कँमेरातून चोरटे कुणाकडे गेले हे कळू शकते,त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केल्याचे वृत्त आहे.